सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आ. बाबर यांचे सांत्वन | पुढारी

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आ. बाबर यांचे सांत्वन

विटा; पुढारी वृत्तसेवा : आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे निधन झाल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटा येथील निवासस्थानी येऊन आ. बाबर यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार बाबर यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबर कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर स्वतः व आमदार बाबर, त्यांचे सुपुत्र अमोल व सुहास यांना बाहेर गॅलरीत आणले. आमदार बाबर यांच्या पाठीवर आधाराचा हात दिला व जनतेला अभिवादन केले. आमदार बाबर यांनीही हात जोडून जनतेसमोर कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे व आमदार बाबर यांचे अल्पावधीतच जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. शिंदे गटाच्या उठावातील एक अग्रेसर म्हणून आमदार बाबर यांचे नाव घेतले जाते. या मोहिमेत गुवाहाटीत असल्यापासून आमदार बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर त्यांचे दुर्दैवी निधन झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी दुःख व्यक्त करत आमदार बाबर यांच्या निवासस्थानी येऊन सांत्वन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज आमदार बाबर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. प्रारंभी स्व. शोभाताई बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आमदार बाबर, त्यांचे बंधू दिलीप बाबर, शरद बाबर, अमोल बाबर, सुहास बाबर, हेमंत बाबर, जयंत बाबर, शंतनू बाबर यांच्यासह बाबर कुटुंबीय उपस्थित होते.

Back to top button