सांगली : चाकूच्या धाकाने मुलीचा विनयभंग | पुढारी

सांगली : चाकूच्या धाकाने मुलीचा विनयभंग

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा महिन्यापासून चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ब्लॅकमेल करून मुलीला जबरदस्तीने चॅटिंग करण्यासही भाग पाडले. याप्रकरणी साद राजू गडकरी (वय 20, रा. अलिशान चौक, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलगी शहर परिसरात राहते. ती इयत्ता दहावीत शिकते. ती शाळेला जाताना गडकरी हा तिचा पाठलाग करीत असे. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करीत होता. मुलीने त्याला नकार दिला. तरीही त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. चाकूचा धाक दाखवून त्याने तिला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून चांदणी चौक परिसर, हुनमाननगर, बापट मळा येथे नेले. तसेच मिरजेत दर्ग्याला दर्शनासाठीही घेऊन गेला होता.

पीडित मुलीचा शाळेत अभ्यासाचा ग्रुप आहे. या ग्रुपवर गडकरी हा ‘अ‍ॅड’ झाला होता. वास्तविक तो शाळेचा विद्यार्थी नाही. तरीही तो ‘अ‍ॅड’ झाला होता. यातून त्याने मुलीचा मोबाईल क्रमांक मिळविला. यावर संपर्क साधून तो तिला चॅटिंग करण्यास भाग पाडत होता. मुलीची तयारी नव्हती. पण तो सातत्याने चाकूच्या धाकाने धमकावत होता. त्यामुळे मुलगी त्याच्याबरोबर चॅटिंग करीत होती.

गडकरी हा गेल्या सहा महिन्यापासून खूप त्रास देऊ लागला होता. तो अगदी शाळेच्या परिसरात जाऊन तिला दुचाकीवर बसण्यास भाग पाडत होता. त्याचा हा त्रास सहन न झाल्याने मुलीने घरी हा प्रकार सांगितला. घरच्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

गडकरी याच्याविरूद्ध विनयभंग, धमकावणे व बाललैंगिक प्रतिबंधक अत्याचार कायद्यांर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुपारी गडकरी याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. शाळेच्या ग्रुपवर कसा ‘अ‍ॅड’ झाला याचा तपास केला जाणार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी यादव तपास करीत आहेत.

Back to top button