सांगली : सावकारीच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाणे आवारात आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

सांगली : सावकारीच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाणे आवारात आत्महत्येचा प्रयत्न

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सावकारीच्या जाचातून वारंवार शिवीगाळ करत मारहाण करत असल्याच्या त्रासातून एका रिक्षा चालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या आवारातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने धाव घेतल्याने अनर्थ टळला. हा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी रिक्षा चालक संजय दादासो कदम (वय 47, रा. सह्याद्रीनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सावकाराविरूध्द फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सावकार रमजान मोमीन (रा. वांगीकर प्लॉट, सांगली) याच्यावर सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी कदम हे कुटुंबीयांसह रेल्वे स्टेशन परिसरातील सह्याद्रीनगर परिसरात राहतात. याच परिसरातील वांगीकर प्लॉटमध्ये संशयित सावकार रमजान मोमीन हे राहतात. कदम यांचा रिक्षा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी कदम यांनी मोमीन यांच्याकडून एक लाख रुपये घेतले होते. त्यातील 50 हजार रुपये व्याजाने आणि 50 हजार उसने दिले होते. अनेक महिने झाले तरी 50 हजारांचे व्याज अथवा पैशांबाबत कदम हे टाळाटाळ करू लागल्याने सावकार मोमीन यांनी त्यांची रिक्षा काढून घेतली होती. यावेळी त्यांच्यात अनेकदा वादही झाले होते. त्याच्यातून मोमीन याने कदम यांना मारहाण देखील केली होती.

वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून त्याशिवाय रिक्षा काढून घेतल्याने कदम यांचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद पडले. त्यामुळे ते शुक्रवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आले. पोलिस ठाण्याच्या आवारात येऊन त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. त्यात ते जमिनीवर कोसळले. परिसरात असणार्‍या पोलिसांनी तातडीने धाव घेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सावकार रमजान मोमीन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तानाजी कुंभार हे करत आहेत.

Back to top button