सांगली : रिक्‍त शिक्षक पदांचे होणार समायोजन | पुढारी

सांगली : रिक्‍त शिक्षक पदांचे होणार समायोजन

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील रिक्त शिक्षक पदांचे समायोजन करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी एका शिक्षकावर पहिली ते सातवी पर्यंतचा अतिरिक्त भार होता. दै. ‘पुढारी’ मध्ये याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. तसेच तालुक्यात 272 शिक्षक पदे रिक्त आहेत. याकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, यानंतर कागनरी कन्नड शाळेला आणखी दोन शिक्षक नियुक्त करणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी रतिलाल साळुंखे यांनी सांगितले.

जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तालुक्यात पटसंख्येप्रमाणे कमी शिक्षक असलेल्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती आवश्यक आहे, अशा शाळांत समायोजन करण्याबाबतचा आदेश काढला आहे. यामुळे ज्या ठिकाणी कमी विद्यार्थी संख्या आहे, त्या शाळेतील शिक्षकांची जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहेत. लवकरच या नियुक्ती अपेक्षित असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याचे अधिकार गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

तालुक्यात कागनरी कन्नड शाळेस संच मान्यताप्रमाणे पाच शिक्षकांची नियुक्ती गरजेची आहे. परंतु, येथे केवळ एक शिक्षक आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार होता. यामुळे पालकांनी कमी शिक्षक शाळेत असल्याने आपल्या पाल्यांचे दाखले देण्याची मागणी केली होती. दै. ‘पुढारी’मधील वृत्तानंतर या शाळेला दोन शिक्षक मिळणार आहेत. दरम्यान, पटसंख्या जास्त असूनही तालुक्यात काही शाळेमध्ये शिक्षक नाहीत. यातून विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. शिक्षकांवर अतिरिक्त ताण होता. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांचे आवश्यकता असलेल्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे.

जत तालुक्यात कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षक जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्ती करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबाबतचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गटविकास अधिकारी यांना दिला आहे. मात्र, सदरची प्रक्रिया तात्पुरती आहे. पवित्र पोर्टलमधून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा.
– राजेंद्र बिराजदार, कन्नड शिक्षक नेते, जत

Back to top button