सांगली : कासेगावात वृद्धाचा खून
कासेगाव : पुढारी वृत्तसेवा : कासेगाव (ता. वाळवा) येथे अज्ञाताने सिमेंट काँक्रीटचा दगड डोक्यात घालून एका वृद्ध व्यक्तीचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मज्जिद युसुफ अत्तार (वय 60, रा. कासेगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना काल गुरुवारी 21 रोजी रात्री उशिरा उघडकीस आली. कासेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. खुनाचा कासेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मज्जीद अत्तार यांचे मूळ गाव कासेगाव आहे. सध्या ते शेणे (ता. वाळवा) येथे त्यांच्या बहिणीकडे राहत होते. ते शेतमजुरी करायचे. ते कामानिमित्त कासेगावला नेहमी ये-जा करत. काल गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कासेगावला कामानिमित्त सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आले होते.
रात्री अकराच्या सुमारास कासेगाव येथील राजारामबापू साखर कारखाना गट कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह काही नागरिकांना आढळून आला. याबाबत नागरिकांनी कासेगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली.