सांगली : ‘सिव्हिल’मध्ये कैदी, आरोपींची बडदास्त! | पुढारी

सांगली : ‘सिव्हिल’मध्ये कैदी, आरोपींची बडदास्त!

सांगली ; सचिन लाड : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात कैदी व आरोपींची चांगलीच बडदास्त ठेवली जात आहे. रुग्णालयातील तुरुंग विभाग बंद केल्याने कैदी, आरोपींना वॉर्डात पायाला बेड्या ठोकून उपचार केले जात आहेत. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक व समर्थकांची गर्दी होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात साडेतीनशेहून अधिक कच्चे कैदी आहेत. स्वतंत्र दवाखाना आहे. एक वैद्यकीय अधिकारी नियुक्तीवर आहेत. किरकोळ आजारावर कारागृहातच औषधोपचार केले जातात. परंतु काही दिवसांपासून आजारी बहुतांश कैद्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे.

रुग्णालयात एका कोपर्‍यात आमने-सामने असे दोन तुरुंग होते. कोणताही कैदी अथवा आरोपीला उपचारासाठी आणले की या तुरुंगात ठेवले जात होते. या तुरुंगात खाट, गादी, बाथरूम अशी सोय होती. पूर्वी याच ठिकाणी रुग्णालयातील पोलिस चौकीही होती. कैद्यावर रुग्णालयातच उपचार करणे गरजेचे वाटल्यास त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. कैद्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने कारागृहात रुग्णवाहिकाही दिली आहे. परंतु कैद्यांना तुरुंगात आजही रिक्षातून आणले जाते.

रुग्णालयातील तुरुंग विभाग काढूनच टाकल्याने कैदी असो अथवा आरोपी, त्यांच्यावर वॉर्डमध्ये उपचार केले जात आहेत. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता असे समजले की, तुरुंग अस्वच्छ असायचा. उपचार करणार्‍या डॉक्टरांचा अट्टाहास की कैदी वॉर्डातच पाहिजे. या घडामोडीत कैदी व आरोपींचा फायदा होत आहे. त्यांना नातेवाईकांना भेटता येत आहे. दररोज घरचे जेवण मिळत आहे. कैदी असेल तर कारागृहातील रक्षक, आरोपी असेल तर पोलिस असा त्यांच्याजवळ बंदोबस्त ठेवला जात आहे.

नातेवाईक भेटतात. पडद्याआड राहून गुन्हेगारी कारयावा करता येतात. घरचं जेवण मिळत म्हणून अनेकदा कैदी व आरोपी आजारी असल्याचं ढोंग करतात. ‘चिरीमिरी’साठी यंत्रणाही त्यांना पाठीशी घालते. रुग्णालयात कोणतीही सुरक्षितता नसताना खुलेआम वार्डात ठेवणे हे कैद्यांच्यादृष्टिने घातक आहे. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते.

पोलिस गाडीभोवती गराडा

खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना पोलिस गाडीतून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणले जाते. त्यावेळी आरोपींचे समर्थक व नातेवाईकांची गर्दी होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तासभर गाडी थांबून असते. त्यावेळी समर्थक व नातेवाईक गाडीभोवती गराडा करून असतात.

हॉटेलमध्ये बैठक : साक्षीदारांना धमक्या

रुग्णालय परिसरात काही हॉटेल आहेत. तिथे चहा पिण्याच्या निमित्ताने कैद्यांना हॉटेलमध्ये नेले जाते. तिथेही समर्थकांची गर्दी असते. दाखल असलेल्या गुन्ह्यातील साक्षीदारांना फोडण्यासाठी नियोजन केले जाते. मोबाईलवरून धमक्या देण्याचा उद्योग केला जातो. हा सारा प्रकार पोलिसांच्या साक्षीने होतो.

Back to top button