अध्यात्मामुळेच तरुण पिढी तरेल : इंदुरीकर महाराज | पुढारी

अध्यात्मामुळेच तरुण पिढी तरेल : इंदुरीकर महाराज

कासेगाव : पुढारी वृत्तसेवा भविष्यकाळाचा वेध घेऊन पुढील तरुण पिढीला वाचवायचे असेल तर प्रत्येक मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्माची माहिती दिली पाहिजे. हीच खरी स्व. आनंदराव पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असे मत कीर्तनकार ह. भ .प. इंदुरीकर महाराज यांनी केले. रेठरेधरण (ता. वाळवा) येथे स्व. आनंदराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. उद्योजक दादासाहेब पाटील, प्रतीक पाटील, युवा नेते हर्षवर्धन पाटील, युवा नेते अतुल पाटील उपस्थित होते.

इंदुरीकर महाराज म्हणाले, सध्याच्या काळात प्रत्येक युवकाने लाज न बाळगता कोणतेही काम करावे. तोच यशस्वी होतो. देवधर्म करीत असताना धर्माचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी होऊ लागला आहे. देव पाहायचा नाही तर देव व्हायचंय. समाजात देवा -धर्माचे ढोंग सुरू आहे. खरा धर्म आळंदी ते पंढरपूर निघालेली 22 दिवसांची पायी चालणारी दिंडी होय. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, सुरूल अध्यक्ष संदेश पाटील, संचालक बंडोपंत नांगरे, संचालक संजय शिंदे, नामदेव मोहिते, पोपट जगताप, रणजीत पाटील, संजय पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील, विराज शिंदे, शिवाजी साळुंखे, संतोष पाटील, अमृत पाटील तसेच वाळवा, शिराळा तालुक्यातील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचसूत्रीचे पालन हीच आदरांजली

इंदुरीकर महाराज म्हणाले, प्रत्येक गावात एक व्यक्‍ती एक झाड लावले पाहिजे. त्यासाठी सरपंच व सर्व सदस्यांनी पुढाकार घ्यावा. अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत विसर्जन न करता ती शेतात खड्डे काढून त्यावर झाडे लावा.अंत्यविधीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना मदत करा. लग्नसमारंभ कार्यात, सत्कार समारंभावर होणारा खर्च टाळून तो गावातील शाळांच्या विकासासाठी वापरावा. ऑक्सिजन पुरवणारी तुळस ही वनस्पती प्रत्येक महिलांनी आपल्या अंगणात लावावी, या पंचसूत्रीचे पालन करून संकल्प हीच खरी आनंदराव पाटलांना श्रद्धांजली ठरेल.

Back to top button