सांगली: मणेराजुरी येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून | पुढारी

सांगली: मणेराजुरी येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

तासगाव; पुढारी वृत्तसेवा: मणेराजुरी (ता. तासगाव) येथे किरकोळ कारणावरून साहेबराव चंद्रकांत शिदगणेश (वय 37) या तरुणाचा कुर्‍हाड, कोयता व चाकूने वार करून खून करण्यात आला. खुनाचा प्रकार शुक्रवारी रात्री उशिरा घडला आहे. याबाबत साहेबराव याची आई सरुबाई चंद्रकांत शिदगणेश (वय 60) यांनी तासगाव पोलिसात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यात रोहन्या ऊर्फ दिनेश अनिल माने, बापूसो ऊर्फ बाजीराव बन्सीलाल चव्हाण, दादासो अशोक कांबळे व लखन कांबळे (सर्व रा. मणेराजुरी) याचा समावेश आहे. या प्रकरणी रोहन्या माने, दादासो अशोक कांबळे व बापूसो चव्हाण
(सर्व रा, मणेराजुरी) तिघांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. यातील चौथा संशयित लखन कांबळे हा फरार आहे.

या बाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : मयत साहेबराव आणि संशयित लखन कांबळे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी मणेराजुरी बस स्थानक चौकात जोरदार बाचाबाची झाली होती.या वेळी काहींनी मध्यस्थी करून त्यांना घरी जाण्यास सांगितले होते. मात्र या वेळी संशयितांनी बघून घेण्याची धमकी दिली होती.

रात्री उशिरा साहेबराव हा गव्हाण रस्त्यावरील समाजमदिरात यात्रेनिमित्त असणार्‍या जेवणासाठी गेला होता. याठिकाणी पुन्हा त्यांच्यात वाद उफाळून आला. समाज मदिरासमोर संशयित आणि मयत साहेबराव हे एकमेकांशी वाद घालत होते. यावेळी संशयितांनी साहेबराव याच्यावर कुर्‍हाड, चाकू व कोयत्याने सपासप वार केले. चाकूने बरगडीजवळ दोन वार वर्मी लागल्याने साहेबराव जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. लखन याने कुर्‍हाडीने डोक्यात तर बापूसो याने कोयत्याने वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन साहेबराव हा गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील दीपक तेली घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जखमी साहेबराव याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण साहेबराव याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करण्यापूर्वीच रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम, नामदेव तारडे, संदीप गुरव यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी तातडीने हालचाली करून तीन संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Back to top button