सांगली : इस्लामपूर महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग! | पुढारी

सांगली : इस्लामपूर महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली-इस्लामपूर रस्ता आणि खड्डे असे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून तयार झाले आहे. आजपर्यंत या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे. मात्र आजही लक्ष्मी फाट्यापासून ते तुंगपर्यंतचा रस्ता आहे कुठे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने हे खड्डे मुजवण्याची मागणी होत आहे.

डिसेंबर 2017 मध्ये हा रस्ता केंद्राकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. 2018 मध्ये पेठ-सांगली या रस्त्याच्या कामासाठी 12 कोटींची निविदा काढण्यात आली होती. तीन टप्प्यात त्याचे काम करण्यात आले. सन 2019 मध्ये पुन्हा पूरग्रस्त निधीतून डिग्रज फाटा ते टिळक चौक या रस्त्यासाठी 10 कोटी मंजूर करण्यात आले होते. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. तीन ते चार वर्षांत रस्ता दुरुस्तीसाठी 22 कोटी रुपये खर्च करण्यात आले. अधूनमधून पॅचर्वकसाठी पैसे खर्च केले ते वेगळेच. आजपर्यंत या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्याची अवस्था शेताततील पाणंद रस्त्यासारखीच आहे. पैसे खर्च होतात, मग रस्ता हा होत नाही. रस्ता झाला तर तो जास्त दिवस का टिकत नाही, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस आहे. परिणामी या रस्त्यावर असणार्‍या खड्ड्यांत पाणी साचले आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गाडी जोरात आदळून अपघात होत आहे. त्यामुळे मान, पाठदुखीचे अनेकांना त्रास सुरू झाले आहेत. खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होत आहे. या मार्गावर प्रवास करताना मृत्यूच्या मार्गावर प्रवास सुरू करत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांतून व्यक्‍त होत आहे. या जीवघेण्या परिस्थितीकडे या भागातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. तातडीनेे खड्डे मुजविण्याची मागणी होत आहे.

मंत्री गडकरी यांच्या आश्‍वासनाची डेडलाईन आली संपत : मात्र रस्त्याच्या कामाला अद्यापही नाही मुहूर्त

सांगली ते पेठ या महामार्गाचे काम तीन-चार महिन्यांत सुरू होईल, असे आश्‍वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्च महिन्यात सांगलीत एका कार्यक्रमात दिले होते. त्यांच्या घोषणेची मुदत या महिन्यात संपते. मात्र, प्रत्यक्षात आजही रस्त्याचा कामाचा मुहूर्त झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात रस्ता होणार की नेहेमीप्रमाणे केवळ घोषणाच होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर जिल्ह्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी आता त्यांनीची पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

Back to top button