याला म्हणतात जिगर! …वयाच्या पंचाहत्तरीत मोटारसायकलवरुन कसबेडिग्रजहून अमरनाथकडे कूच! | पुढारी

याला म्हणतात जिगर! ...वयाच्या पंचाहत्तरीत मोटारसायकलवरुन कसबेडिग्रजहून अमरनाथकडे कूच!

सांगली : पुढारी वृत्तसेवा उन, वारा, पाऊस कशा कशाचीही तमा न बाळगता मनात श्रद्धा ठेवून मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज येथील जयवंतराव केदारराव चव्हाण हे वयाच्या 75 व्या वर्षी मोटारसायकलवरून अमरनाथ यात्रेला निघाले आहेत. अमरनाथ श्रीनगरपासून साधारणपणे 135 किमीवर समुद्रसपाटीपासून 13600 फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात.

जयवंतराव केदारराव चव्हाण हे कसबेडिग्रज गावात राहतात. त्यांचा मुलगा विजयसिंह चव्हाण यांचा हॉटेलिंगचा व्यवसाय आहे.  सून प्रियांका पार्लर चालवतात. गावातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग ते सातत्याने करीत असतात. देवदर्शनाची आवड असलेल्या जयवंतरावांना त्यांच्या कुटुंबियांचा देखील सपोर्ट आहे.

जयवंतराव गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी या यात्रेला जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या कसबेडिग्रज गावच्या सुपुत्राने ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ असाच काहीतरी तरूणांना संदेश देत ते प्रवासाला निघाले आहेत.

वारकरी संप्रदायातील चव्हाण हे विठ्ठलाचे भक्त आहेत. तसेच ते शंकराचीही भक्ती करतात. प्रचंड उत्साहात ते गेल्या 20 वर्षांपासून अमरनाथची यात्रा करीत आहेत. काही वर्षे पायी तर, काही वर्षे सायकलवरून त्यांनी अमरनाथची यात्रा केली आहे. जयवंतराव चव्हाण यांना एक मुलगा, सुना, नातवंडे असे कुटुंबिय आहे. त्यांची 10 एकर बागायत जमीन आहे. ते गेली कित्येक वर्षे शेती करून उदरनिर्वाह करतात. कुटुंबियातील प्रत्येकांनी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जगणाची मुभा दिली आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात ते त्यांना प्रोत्साहन देत असतात. या आधारावरच तिरूपती बालाजी, आदमापूर येथील बाळूमामा अशा अनेक मंदिरांना त्यांनी कधी चालत तर,
कधी सायकलवरून जाऊन दर्शन घेतले आहे.

दि. 21 जूनरोजी कसबे डिग्रज येथून त्यांनी मोटारसायकलवरून अमरनाथ यात्रेला सुरुवात केली आहे. गाडी सुरू केल्यानंतर किमान 500 किलोमीटरचा प्रवास केल्याशिवाय ते थांबतच नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. वाटेत मंदिर अथवा हॉटेलमध्ये जेवण करून तेथेच ते आसरा घेतात. त्यांना अद्यापही कोणताही चष्मा लागलेला नाही. अशा या अवलिया जयवंतरावचे कार्य तरुणांना लाजवेल, असे आहे. त्यांच्यापासून आजच्या तरूणांनी स्फूर्ती घेण्यास हरकत नाही.

हेही वाचा

Back to top button