सोलापूर : शंभर सेवेकर्‍यांनी केली 700 वारकर्‍यांची मोफत दाढी, कटिंग | पुढारी

सोलापूर : शंभर सेवेकर्‍यांनी केली 700 वारकर्‍यांची मोफत दाढी, कटिंग

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा श्री संत गजानन महाराज पालखीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांचे सोलापुरातील श्री संत नाभिक दुकानदार संघाच्या सुमारे 100 सेवेकर्‍यांनी 600 ते 700 वारकर्‍यांची मोफत दाढी कटिंग केली. गेल्या 20 वर्षांपासून नाभिक संघ हे सेवाकार्य करत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी दिली. श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन सोमवारी शहरातील उपलप मंगल कार्यालयात सकाळी झाले. त्यानंतर वारकर्‍यांसह भाविकांची हजारो संख्येने दर्शन घेण्यासाठी दिवसभर गर्दी होती. शहरातील सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात श्री गजानन महाराज यांची पालखी येताच भाविकांची दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

यामध्ये अनेक दानशुरांनी वारकरी तसेच भाविकांना मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री शंकर महाराज प्रतिष्ठान व जय भवानी नवरात्र युवक मंडळ यांच्यावतीने येणार्‍या सर्व वारकरी व भाविकांना एक हजार 100 क्‍विंटलचा मसाला भाताचे वाटप करण्यात आला. या महाप्रसादाचे आयोजन रूपेश जक्कल मित्र परिवारांने केले होते.

याबरोबर उपलप मंगल कार्यालयाचे मालक व्दारकाप्रसाद उपलप यांनी 500 किलो शिराचे वाटप केले. हे महाप्रसाद घेण्यासाठी वारकर्‍यांसह भाविकांची रांग लागली होती. याबरेाबर पालखीमध्ये सहभागी झालेल्या 100 वारकर्‍यांच्या कपड्याला विना मोबदला इस्त्री करून देण्यात आली. या गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी लहानपासून तरुण, वयोवृध्द भक्‍तांची मोठी गर्दी झाली होती.

व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत
शहरात उपलप मंगल कार्यालयात श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन झाल्यानंतर पूजेचे साहित्य व महिलांचे सौदर्य प्रसाधनाचे साधनाने दुकानी थाटण्यात आली होती. या दुकानातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

Back to top button