म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : गुप्तधनाच्या हव्यासातून वनमोरे कुटुंब कर्जबाजारी! | पुढारी

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : गुप्तधनाच्या हव्यासातून वनमोरे कुटुंब कर्जबाजारी!

सांगली ; सचिन लाड : संपूर्ण जिल्हा हादरवून सोडलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. गुप्तधनाच्या हव्यासातून हे कुटुंब कर्जबाजारी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ‘एलसीबी’ चे पथक गावात तळ ठोकून गोपनिय चौकशी करीत आहे.

पाणीपुरीची पार्टी दोन ठिकाणच्या घरात झाली. याच पार्टीने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे हे दोघे सख्खे भाऊ… पण विभक्‍त राहत होते. पोपट यांचा मुलगा शुभमला काही महिन्यांपूर्वी दोन मांत्रिक भेटले होते. या मांत्रिकांनी त्याला ‘तुमच्या घरातील गुप्तधन शोधून देण्याचे आमिष दाखविले. दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचे धन घरातून शोधून देण्याची ग्वाही या मांत्रिकांनी दिली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

गुप्तधनाचे काम करून देण्यासाठी मांत्रिकांनी दीड-दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. शुभमने हा प्रकार त्याचे वडील पोपट व चुलते डॉ. माणिक यांना सांगितला होता. सुरुवातीला या दोघांनी यावर विश्‍वास नसल्याचे सांगितले. पण शुभमने त्यांना फारच गळ घातली. त्यानंतर वनमोरे बंधू तयार झाले.

मांत्रिकांना देण्यासाठी मग त्यांनी गावातून काही जणांकडून तसेच खासगी सावकारांकडून पैसे उचलले. गेली वर्षभर वनमोरे कुटुंबात गुप्तधनाचा हा विषय सुरू होता. याची गावातही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, अशी माहितीही आता पोलिसांना लागली आहे. याच माहितीच्याआधारे तपासाला वेगळी दिशा देण्यात आली आहे.

मांत्रिकांना कोट्यवधी रुपये दिले. पण प्रत्यक्षात या मांत्रिकांनी त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. सावकार व काही जणांकडून घेतलेले लोक मग पैशाची मागणी करू लागले. तेंव्हापासून हे कुटुंब चिंताग्रस्त झाले. यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

विषारी द्रव्य प्राशन करण्यासाठी पाणी पुरीची पार्टी करण्याचे ठरविले असण्याची शक्यता आहे. याच पाणीपुरीने नऊ जणांचा बळी घेतला आहे, हे जवळपास स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबातील काही जणांचे मोबाईल क्रमांक तपासले जात आहेत. यातून धक्कादायक माहिती हाती लागत आहे.

दोन चिठ्ठीतील मजकुराबाबत गूढ कायम

वनमोरे कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्या आहेत. यातील मजकुराबाबत पोलिसांनी कमालीची गोपनियता बाळगली आहे. त्यामुळे चिठ्ठीतील मजकूरबाबत गूढ कायम आहे. तपासाच्यादृष्टिने प्रसारमाध्यमांपासून ही बाब पोलिसांनी लपवून ठेवली आहे. लवकरच छडा लावला जाईल, असे सांगण्यात आले.

गुन्हा दाखल झालेले सगळेच नाहीत सावकार

नऊ जणांच्या आत्महत्या प्रकरणात 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पण यातील सगळेच सावकार नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वनमोरे कुटुंबाने काही प्रतिष्ठीत लोकांकडून हातउसनेही पैसे घेतले होते. कुटुंबाने लिहलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटकेची कारवाई केली आहे.

* जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या घटनांवर नजर…
* नरबळी दिल्यानंतर मिळणार गुप्तधनाचा खजाना
* अमावस्येला कासव पूजा केल्यानंतर मिळणार गुप्तधन
* जडीबुटीची पूजा केल्यानंतर पैशाचा पाऊस
* नागमणी बाळगल्यावर घरात सापडणार गुप्तधन    

Back to top button