जन्मठेपेतील कैदी सांगलीतून गायब | पुढारी

जन्मठेपेतील कैदी सांगलीतून गायब

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना आजारी रजेवर आलेला अशोक शीतलसिंग गौर (वय 37, रा. पंचशीलनगर, सांगली) हा कैदी गायब झाला आहे. याबाबत कळंबा कारागृह प्रशासनाने तो गायब असल्याची फिर्याद संजयनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

कोरोनाच्या काळात अशोक गौर हा आजारी होता. यासाठी कारागृह प्रशासनाने त्याला अभिवचन रजा मंजूर करुन घरी जाण्यास परवानगी दिली होती. दि. 24 जून 2021 रोजी तो रजेवर आला आहे. त्यानंतर तीस-तीस दिवसांच्या फरकाने टप्प्याटप्प्याने त्याच्या रजेत वाढ करण्या आली होती.

दि. 5 जून 2022 रोजी त्याच्या रजेची मुदत संपली होती. दि. 6 जूनला त्याने कळंबा कारागृहात हजर होणे गरजेचे होते, पण तो गायब झाला आहे. कारागृह प्रशासनाने येथे येऊन चौकशी केली, पण घरच्यांनी तो कारागृहात हजर होण्यासाठी गेला असल्याचे सांगितले.

कारागृह प्रशासनाने तब्बल 14 दिवस त्याची प्रतीक्षा केली. पण तो अजूनही तिथे हजर झालेला नाही. त्यामुळे कळंबा कारागृहातील देविदास भगवान शिंदे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तो गायब असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गौरच्या घरावर छापा टाकला, पण तो सापडला नाही. हवालदार गजानन गोसावी तपास करीत आहेत.

जिल्ह्यातील सात कैद्यांचे गूढ वाढले!

जन्मठेपेची शिक्षा भोगताना रजेवर आलेले जिल्ह्यातील सात कैदी गायब आहेत. यातील सहा कैदी तर आठ वर्षे झाली गायब आहेत. ते गेले कुठे? याबद्दल आता चांगलेच गूढ वाढले आहे. त्यांचा शोध घेताना पोलिस यंत्रणेची दमछाक होत आहे.

Back to top button