सांगली : बहीण विधवा, भाचे अनाथ अन् मामा गेला तुरुंगात | पुढारी

सांगली : बहीण विधवा, भाचे अनाथ अन् मामा गेला तुरुंगात

सांगली ; सचिन लाड :

गुंड जावेद गवंडी…हे पोलिस रेकॉर्डवरील नाव शुक्रवारी कायमचे पुसले गेले. जावेदच्या सख्ख्या मेहुण्याने मित्राच्या मदतीने कायमचा काटा काढून स्वत:च्या बहिणीला विधवा केले. बहिणीचा दररोज होणारा छळ व स्वत:चा जीव वाचविण्यासाठी मेहुण्याने केलेल्या कृत्यामुळे दोन कुटुंबे मात्र उद्ध्वस्त झाली आहेत.

जावेद गवंडी याचा संजयनगर येथील जस्मीन कुरणे हिच्याशी दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर येथे राहत होता. मजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे. लग्नानंतर त्याला दोन मुले व एक मुलगी झाली. कुटुंब वाढल्याने मजुरीवर त्याचा घरखर्च चालेना. यातच त्याला दारूचे व्यसन लागले. आपसूकच मग त्याची पावले गुन्हेगारीकडेे वळली. किरकोळ चोर्‍या करणारा जावेद मोठ्या चोर्‍या करू लागला. कित्येकदा तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. अनेकदा त्याला अटकही झाली. मुलगी आणि मुले मोठी होऊ लागली, पण त्याने गुन्हेगारीचा मार्ग सोडला नाही.

दररोज दारू पिऊन तो घरी दंगा करू लागला. पत्नीशी भांडत असे. काही वर्षापूर्वी तो जुना बुधगाव रस्त्यावर राजीवगांधीनगर झोपडपट्टीत राहण्यास आला. मात्र त्याने गुन्हेगारी आणि दारूचे व्यसन सोडले नाही. पत्नी जस्मीन त्याच्या दररोजच्या भांडणाला वैतागून गेली होती. भाऊ तौफीक कुरणे याला ती फोन करुन पती त्रास देतो, असे सांगायची. चार दिवसांपूर्वी जावेद आणि जस्मीनमध्ये कडाक्याचे भांडण झाले. जस्मीन माहेरी निघून गेली. यामुळे जावेद बेचैन होता. सलग तीन दिवस तो कोयता घेऊन संजयनगरला सासरवाडीत जस्मीनकडे जाऊन दहशत माजवित होता. जस्मीनला येण्यासाठी विनंती करीत होता. तिच्यासह भाऊ तौफीक कुरणे, त्याची पत्नी व मुलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी द्यायचा. जावेद हा काहीही करू शकतो, असे तौफीकला वाटत होते. बहिणीचा होणारा छळ आणि स्वत:च्या जीवाला धोका असल्याने तौफीकने मित्राच्या मदतीने जावेदचा कायमचा काटा काढला.

जावेदचा खून केल्याने कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. उलट जावेद आणि तौफीकचेच कुटुंब उद्ध्वस्त झाले. तौफीक पेंटींग काम करतो. त्यालाही दोन मुले आहेत. जावेदचा खून करुन त्याने बहिणीला तर विधवा केलेच. याशिवाय भाचा व भाचीला वडिलांच्या सुखापासून दूर केले. जावेदच्या खुनाने दोन्ही कुटुंबाची मात्र वाताहत झाली. जावेदच्या

वडिलांचे निधन झाले आहे. आई आहे. तिचा सांभाळ जावेदचा मोठा भाऊ फिरोज गवंडी हा करीत आहे. तो सेंट्रिंग काम करीत असून कुपवाडमध्ये राहतो.

जावेदचे प्राण वाचले असते…

जावेद कोयता घेऊन तौफीकच्या घरी जाऊन दोन-तीन दिवस धमकावत होता. तौफीकने गुरुवारी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र जावेदवर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे तौफीक खूपच घाबरला होता. आपण संपण्यापेक्षा जावेदलाच संपवूया, असा विचार करुन नियोजनबद्धपणे त्याने मित्राची मदत घेऊन खून केला.

हेही वाचा

Back to top button