nana patole : राष्ट्रवादीची भूमिका भाजपला मदत करणारी – नाना पटोले | पुढारी

nana patole : राष्ट्रवादीची भूमिका भाजपला मदत करणारी - नाना पटोले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक असो की इतर अनेक मुद्दे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही भाजपला मदत करणारी राहिली आहे. फक्त आताच नव्हे, गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी भाजपला मदत करण्याचं काम करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. राज्यात अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं त्यांचं उल्लंघन करण्यात आलं. सोनिया गांधी यांचा अपमान करण्यात येतोय आणि तो आम्ही सहन करणार नाही. एकूणच राष्ट्रवादीच्या भूमिकेची तक्रार आम्ही हायकमांड केली आहे. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं पटोले म्हणाले.

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबतही पटोले (nana patole) म्हणाले की, अजित पवारांचं ते वक्तव्य व्यक्तिगत आहे, त्यावर आपण बोलणार नाही. पण पक्ष म्हणून आपण राष्ट्रवादीची तक्रार हायकमांड केली आहे. येत्या दिवसांत त्याचे परिणाम दिसतील, असं पटोले म्हणाले. राज्यातील सत्तेत काँग्रेस राहणार की नाही? असा प्रश्न पटोलेंना विचारण्यात आला. याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असंही त्यांनी सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची एकला चलो रे भूमिका राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नाना पटोलेची पार्श्वभूमी ही देशाला माहिती आहे. नाना पटोले हा सत्तेसाठी धडपणारा नाही. जनतेसाठी आणि विचारांसाठी लढणार आहे. माझ्या राजकीय पार्श्वभूमीची जास्त चिंता करण्याची गरज नाही. नाना पटोलेने समोरून राजीनामा दिला. त्यांच्याशी गद्दारी करण्याचं काम कधीच केलं नाही. नाना पटोलेचा इतिहास एकदम स्पष्ट आहे. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे, असा टोला पटोले यांनी अजित पवार यांना लगावला.

पहाटेची सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. पण लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारबद्दल बोलणं चुकीचं आहे, असं पटोले म्हणाले. राज्यातील सत्तेचा बाबरी ढाचा, पाडणारच, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईतील सभेत केलं. त्यावर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसांचे नवसंकल्प शिबीर रविवारी संपले. या शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्ष भाजपशी लढू शकत नाही. फक्त काँग्रेसमध्ये ती क्षमता आहे, असं वक्तव्य केलं. राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. आता दिल्लीहून परतलेले पटोले यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button