सांगली : मनपा अधिकार्‍याने खिशात पाच हजार कोंबले | पुढारी

सांगली : मनपा अधिकार्‍याने खिशात पाच हजार कोंबले

सांगली : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या एका अधिकार्‍यांनी माहिती मिळाली, कागदपत्रे मिळाली असे माझ्याकडून मानसिक दबावाखाली लिहून घेतले व माझ्या खिशात पाच हजार रुपये कोंबले. मी पैसे घेतल्याचा माझ्यावर आरोप करण्यासाठी हे सर्व कारस्थान केले आहे. याप्रकरणी आयुक्तांकडे तक्रार केली आहे’, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बर्वे म्हणाले, मी महानगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी माहिती अधिकार अर्ज सादर करत असतो. त्याचा उपयोग कोर्ट कामासाठी करतो. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे मी अनेक अर्ज केले आहेत. त्याला कोणताही प्रतिसाद लाभत नाही. त्यावर एक दिवाणी दावाही केला आहे.

बर्वे म्हणाले, महापालिकेत मला शुक्रवारी एक विचित्र अनुभव आला. महापालिकेच्या काही खात्याकडून माझ्यावर मानसिक दबाव व आर्थिक लालूच दाखविण्यात आली. कदाचित तो सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रितही झालेला असावा. संबंधित अधिकारी यांनी माहिती मिळाली, कागदपत्रे मिळाली असे माझ्याकडून लिहून घेतले. त्यासाठी माझ्यावर मानसिक दबाव आणला. मी या महानगरपालिकेत व पूर्वीच्या नगरपालिकेत 40 ते 45 वर्षे काम करत आहे.

कर्मचार्‍यांबरोबर एक प्रकारचे भावबंध जुळले आहेत. त्यामुळे भावनिक आवाहनाला मी अनेक वेळा बळी पडतो. मी न्यायालयात काही केसेस दाखल केल्या आहेत. त्यातील माहिती मी विविध खात्याकडे मागवली असता हा प्रकार घडला आहे. माझ्याबाबत महापालिका प्रशासनाचा हेतू वेगळा असावा, अशी शंका येऊ लागली आहे. त्याबाबत मी न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे. माझ्यावर पैसे घेतल्याचा बेजबाबदार आरोप होण्याची शक्यता वाटली म्हणून आयुक्तांना निवेदन दिले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button