कराड : क्रीडा स्पर्धातील गैरप्रकार रोखण्यासाठी नवे नियम | पुढारी

कराड : क्रीडा स्पर्धातील गैरप्रकार रोखण्यासाठी नवे नियम

कराड : चंद्रजित पाटील

जास्त वय असूनही वयाच्या कागदपत्रामध्ये फेरफार करत काही खेळाडू कमी वयाच्या क्रीडा प्रकारात सहभागी होतात. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आल्याने अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून जन्मतारखेबाबत काही नवी कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. त्यामुळेच आता क्रीडा स्पर्धातील गैरकृत्यांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्रचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवार, 27 एप्रिलला याबाबतचे परिपत्रक काढले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून तालुका, जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर भारतीय शालेय खेळ महासंघ, सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा तसेच जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. वय वर्ष 14, 15,17 आणि 19 वर्ष वयोगटातील या स्पर्धा होतात.

या स्पर्धेसाठी सहभागी खेळाडूंना जन्म तारखेचा पुरावा म्हणून प्रवेश अर्ज व आधार कार्डची प्रत ग्राह्य मानली जात होती. मात्र काही क्रीडा प्रकारांमध्ये जास्त वयाचे खेळाडू वय कमी करून कमी वयोगटाच्या क्रीडा प्रकारात सहभागी होत असल्याच्या तक्रारी संचालनालयास प्राप्त झालेल्या आहेत. तक्रारी प्राप्त झालेल्या खेळाडूंच्या वयाबाबतची शहानिशा करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेतूपुरस्पर खेळाडूंच्या कागदपत्रात फेरफार करून वय कमी केल्याचे आढळून आले आहे. तसेच काही खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धा व एकविध खेळ संघटना पुरस्कृत क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या जन्म तारखा धारण करून खेळल्याचे तक्रारींची शहानिशा करताना आढळून आले आहे. त्यामुळेच जन्म तारीख निश्चित करण्यासाठी संबंधित खेळाडूचे वय 1 वर्ष असताना किंवा किमान 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मतारखेचा दाखला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाचा शासकीय दाखला असल्यास खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत अनिवार्य करण्यात आली आहे.

सर्व कागदपत्रावर एकच जन्मतारीख गरजेची …

आधारकार्ड किंवा पासपोर्ट अनिवार्य असणार आहे. शालेय प्रवेश अर्ज, जन्म दाखला, पहिल्या इयत्तेतील जनरल रजिस्टरमधील जन्म तारीख व आधारकार्ड व पासपोर्ट यामधील नमूद जन्म तारीख सारखीच असणे आवश्यक आहे. असे नसल्यास संबंधित खेळाडूस त्या वयोगटासाठी अपात्र केले जाणार आहे.

Back to top button