Satara : “दुसर्‍यांची पापं फेडण्याची वेळ आता आली आहे” : ना.रामराजे नाईक निंबाळकर

पिंपोडे येथील सभेत बोलताना ना. रामराजे ना. निंबाळकर व्यासपीठावर आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण व इतर.
पिंपोडे येथील सभेत बोलताना ना. रामराजे ना. निंबाळकर व्यासपीठावर आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण व इतर.

पिंपोडे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा

पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पापं फेडण्याची वेळ आता आपल्यावर आली असून शेतकर्‍यांच्या भल्यासाठी मकरंद आबांना साथ द्या, असे आवाहन ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथे आयोजित केलेल्या सभेत ना.रामराजे बोलत होते. यावेळी आ. दिपक चव्हाण, माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ, जि.प.सदस्य डॉ.अभय तावरे, बाळासाहेब सोळस्कर, सुरेश साळुंखे, कारखाना बचाव पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.

ना. रामराजे ना. निंबाळकर म्हणाले, किसनवीर कारखाना बचाव पॅनलला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सर्वसामान्य शेतकरी देत असलेला प्रतिसाद पाहून सत्ताधार्‍यांना घाम फुटला आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा दाम ज्यांना देता आला नाही, कामगारांची देणी ज्यांनी रखडवली, संसार धुळीला मिळवले, किसनवीरआबांनी उभी केलेली संस्था ज्यांच्या पापामुळे बदनाम झाली, तेच लोक पुन्हा मतांचा जोगवा मागत फिरत आहेत.

कोरेगाव तालुक्याच्या राजकारणात आलेल्या काही प्रवृत्ती आता भ्रष्टाचारी लोकांची तळी उचलू लागले आहेत. त्यांचे पैसे घेवून कोणी स्वाभिमान विकू नका. त्याऐवजी तुमच्या घामाचा हिशोब मागा. तुम्ही कष्टाने पिकवलेल्या उसाचे बिल मागा. एवढी वर्षे जी संस्था यांच्या ताब्यात दिली त्या संस्थेचे वाटोळे का झाले याचा जाब विचारा. तुमच्या अन्नात ज्यांनी माती कालवली त्यांचा पुरता हिशेब करण्याची वेळ आली आहे, असे ना.रामराजे म्हणाले.

आ. मकरंद पाटील म्हणाले, यांनी केलेल्या पापाचा घड़ा आता भरला आहे. बचाव पॅनलला तुम्ही दिलेला प्रतिसाद मतदानाच्या दिवसापर्यंत तसाच जागरूक ठेवा. डोळ्यात तेल घालून कारस्थान्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. पोलिस यंत्रणेलाही आम्ही याबाबत कळवले आहे. भ्रष्टाचार्‍यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

यावेळी आ.दिपक चव्हाण,बाळासाहेब सोळस्कर,मंगेश धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.किसनवीरचे माजी संचालक पोपट निकम यांनी यावेळी मकरंद आबांच्या किसनवीर बचाव पॅनलला जाहिर पाठिंबा दिला.

तिन्ही कारखाने सक्षमतेने चालवू : नितीनकाका पाटील

किसन वीर कारखान्याची आत्ताची अवस्था बघता या कारखान्यावर कधीही जप्ती येऊ शकते, एवढा प्रचंड कर्जाचा डोंगर किसन वीर कारखान्यावर मदन भोसले यांनी केला आहे. कारखाना वाचवायचे असेल तर तो फक्त जिल्हा बँकेच्या व सोसायटीच्या मदतीच्या माध्यमातून आम्हीच वाचवू शकतो, मदन भोसलेंचे ते काम नाही. कारखान्याची सत्ता जर सभासदांनी आमच्याकडे सोपवली तर जबाबदारीने तिन्ही कारखाने, डिस्टिलरी, को-जन पूर्ण क्षमतेने चालवू, असा शब्द किसन वीर यांच्या गावात आज मी तुम्हाला देतो, असा ठाम विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केला. किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल उमेदवारांच्या प्रचारार्थ कवठे (ता. वाई) येथे झालेल्या कोपरा सभेमध्ये ते बोलत होते.

नितीनकाका पुढे म्हणाले, मदन भोसले यांनी गेली तीन वर्षे विविध बँकांची कर्जे थकीत ठेवली आहेत. त्यामुळे पत गेल्याने बँकांनी यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. अशावेळी कारखाना जर या संकटातून बाहेर काढायचा असेल तर मी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला विश्वासात घेऊन तुम्हाला प्रती शेअर्स 15 हजार रुपयांचा कर्ज पुरवठा सोसायटींच्या माध्यमातून विना किंवा अल्पव्याजामध्ये करेन. आपण 50 हजार सभासद व नवीन सभासद यांचे मिळून पुन्हा 90 कोटीच्या आसपास भागभांडवल उभे करणार असून यामधून पुन्हा कारखान्याची पत वाढेल व त्यातून जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर माध्यमातून कारखाना सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या पाटील कुटुंबियांकडे असलेली आमदारकी व बँकेचे चेअरमन पद या दोन पदांचा वापर करून फक्त पाटील कुटुंबीय व किसन वीर कारखाना बचाव पँनेलच किसन वीर कारखान्याला या परिस्थितीतून बाहेर काढतील, असा विश्वासही नितिन पाटील यांनी बोलून दाखवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news