सांगली : ‘घनकचरा’चे भवितव्य ‘नगरविकास’च्या हाती | पुढारी

सांगली : ‘घनकचरा’चे भवितव्य ‘नगरविकास’च्या हाती

सांगली : पुढारी वृत्तसेवा

घनकचरा प्रकल्पाच्या वादग्रस्त निविदा मंजुरीच्या ठरावावरून राजकीय धुरळा उठला आहे. सार्‍यांचे लक्ष नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनाकडे लागले आहे. दरम्यान, ठरावाला विरोध करण्याचे काँग्रेस व भाजपच्या स्थायी सदस्य, नगरसेवकांचे पत्र मात्र मसुद्यातच अडकले आहे. ते अद्याप शासनाकडे पाठवलेले नाही.

घनकचरा प्रकल्पसंदर्भात ‘नगरविकास’कडून यापूर्वी महापालिका प्रशासनाला आलेले पत्र व त्यानंतर दि. 11 मार्च 2022 रोजी स्थायी समितीने गुजरातच्या संबंधित कंपनीची निविदा मान्य करून काम देण्यासंदर्भात केलेला ठराव याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाला पाठविलेली आहे. नगरविकास विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यावर नगरविकास विभागाचे मार्गदर्शन अद्याप आलेले नाही. मात्र लवकरच मार्गदर्शन येईल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

भाजपचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महापालिकेतील भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी नगरविकास विभागाला पत्र पाठवले आहे. स्थायी समितीने दि. 11 मार्च 2022 रोजी केलेला ठराव रद्द करावा व घनकचरा प्रकल्पासाठी फेरनिविदा काढावी, अशी मागणी केलेली आहे.

महापालिका प्रशासनाने पाठवलेले पत्र, भाजपने केलेली मागणी या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे पत्र अद्याप नाही

‘घनकचरा प्रकल्पाच्या वादग्रस्त निविदेला मंजुरी दिल्याचा ठराव महापालिका हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे हा रद्द करावा’, अशी लेखी मागणी काँग्रेसतर्फे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे गुरूवारी केली जाणार होती. काँग्रेसच्या गटनेत्यांनी तसे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप हे पत्र नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आलेले नाही.

भाजपचे स्थायी समिती सदस्य देणार पत्र

स्थायी समितीच्या दि. 11 मार्च 2022 च्या सभेत ऐनवेळी विषय आणून निविदा मंजुरीचा केलेला ठराव मान्य नसल्याचे भाजपच्या स्थायी समिती सदस्यांचे पत्र आयुक्तांना व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवले जाणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. पत्राचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र त्यावर स्थायी समिती सदस्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे. सही घेऊन ते पत्र नगरविकास विभागाला पाठवले जाणार असल्याचे भाजपच्या अधिकृत सुत्रांनी सांगितले.

Back to top button