सांगली : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या एका गटाची मिलीभगत | पुढारी

सांगली : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या एका गटाची मिलीभगत

सांगली : पुढारी वृत्तसेवा
घनकचरा प्रकल्पाच्या वादग्रस्त निविदा मंजुरीमागे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या एका गटाची मिलीभगत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे स्थायी समिती सभापती यांचा हा कारभार अत्यंत चुकीचा आहे. निविदा मंजुरीमागे बोलविता धनी वेगळाच आहे, असा आरोप आरपीआय नेते नगरसेवक विवेक कांबळे यांनी केला.

कांबळे म्हणाले, महापालिकेच्या स्थायी समितीने दि. 11 मार्च 2022 रोजी घनकचरा प्रकल्प निविदा मंजुरीचा केलेला ठराव चुकीचा आहे. भाजप नेत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन ठराव विखंडित करण्याबाबत कळवले आहे. घनकचरा प्रकल्प आवश्यक आहे. पण निविदा आणताना त्याबाबतची माहिती सर्वांना देणे गरजेचे आहे. निविदा प्रक्रिया शहराच्या, नागरिकांच्या हिताची असली पाहिजे.

पक्षश्रेष्ठींना डावलले; अभय नाही

कांबळे म्हणाले, घनकचरा प्रकल्प मंजुरीच्या प्रकरणातून राजकीय दुर्गंधी पसरली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींना डावलून ठराव करत असाल तर संबंधितांना अभय दिले जाणार नाही. स्थायी सभापतींमागे कोणाचेतरी डोके असले पाहिजे. तिन्ही पक्ष मिळून कारभार एकत्र करत असाल तर महासभेतच विरोध कशासाठी करताय. जनतेचा विकास साधताय तर मग खुले आम करा, चोरी छुपके कशासाठी? कोणाच्या तरी सांगण्यावरून बोगस ठराव करण्यात येत असेल तर त्याला विरोध राहणार आहे.

Back to top button