सांगलीत दिवसा घरफोडीचे सत्र सुरूच | पुढारी

सांगलीत दिवसा घरफोडीचे सत्र सुरूच

सांगली : पुढारी वृत्तसेवा
येथील माधवनगर रोडवरील शिवोदयनगर परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली. चोरट्याने रोकड व सोन्याच्या दागिन्यासह 80 हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत अशोक शिवदास यादव यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले, अशोक यादव हे कामावर गेले होते. त्यांचा मुलगा क्लासला तर त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दुपारी दोनच्या दरम्यान चोरट्याने घर फोडून कपाटातील 40 हजारांची रोख रक्कम व एक तोळ्याचे मंगळसूत्र, असा 80 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अशोक यादव यांनी संजयनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. शिवोदयनगरमध्ये दोन महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी येथील नरळे कुटुंबियांचे बंद घर चोरट्यांनी फोडले होते. वारंवार चोरीच्या घटना या भागात घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पूर्वी या भागात पोलिसांचे पेट्रोलिंग होत असल्यामुळे चोरीच्या घटना घडत नव्हत्या. आता पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यानंतर चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.

Back to top button