पालघरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप लाचलुचपतच्या जाळ्यात, बदलीसाठी २५ हजार घेताना रंगेहाथ पकडले | पुढारी

पालघरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप लाचलुचपतच्या जाळ्यात, बदलीसाठी २५ हजार घेताना रंगेहाथ पकडले

पालघर : पुढारी वृत्तसेवा

पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सखाराम सानप (वय वर्षे 50) यांना वसईतील एका शिक्षकाच्या बदलीसाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सर्वप्रथम 50 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर सानप यांना 25 एप्रिल रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी रंगेहाथ पकडण्यात आले. सानप यांच्या गैरप्रकारांवर अनेकवेळा जिल्हा परिषदेच्या बैठकीत नाराजी व्यक्‍त करण्यात येत होती. मात्र, त्या कुणालाही जुमानत नसल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार करूनही कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत होते.

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा आयोजनाच्या बैठकीसाठी लता सानप या सायंकाळी 6 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या. मात्र, त्यानंतर घरी गेल्यानंतर ही रक्‍कम त्यांनी स्वीकारली असता त्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. खुद्द शिक्षणाधिकारीच जाळ्यात अडकल्याने पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ आणि भ्रष्टाचाराचे कुरण बनून राहिलेल्या या विभागावर पालघरवासीयांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी पालघरवासीयांनी केली आहे. शिक्षणाधिकारी लता सानप यांचे नातेवाईक मंत्रालयात वरिष्ठ पदावर असून त्यांना वरदहस्त असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही जुमानत नव्हत्या.

गेली दोन वर्षे त्यांच्या कारनाम्यांना पालघरचे शिक्षक पुरते वैतागून गेले होते. प्रस्तावांवर सह्या करण्यासाठी खुलेआम पैशांची मागणी करण्यात येत असल्याने शिक्षण विभागाची लक्‍तरे अनेकवेळा वेशीवर टांगली गेली होती. मात्र, या लाच प्रकरणाचे पडसाद बुधवारी दाखल होणार्‍या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौर्‍यात उमटणार असल्याने जिल्हा परिषदेची नाचक्‍की झाली असल्याची चर्चा ऐकू येत आहे. सानप यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाबरोबरच जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचाही पदभार आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्‍वास, पोलीस हवालदार संजय सुतार, नवनाथ भगत, पागधरे, अमित चव्हाण, विलास भोये, मांजरेकर, स्वाती तारवी आणि सखाराम दोडे यांनी केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button