Sangli : मिरज-पुणे दुहेरीकरण पूर्ण करा | पुढारी

Sangli : मिरज-पुणे दुहेरीकरण पूर्ण करा

मिरज ः पुढारी वृत्तसेवा मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरण तातडीने पूर्ण करा. या कामात येणारे अडथळे तातडीने दूर करून तातडीने दुहेरीकरण पूर्ण करावे, अशा सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या.रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासाठी उपाययोजना, प्रवासी सुविधा, पायभूत विकास कामांसंदर्भात त्यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणे विभाग व्यवस्थापक रेणू शर्मा उपस्थित होत्या.

बैठकीत बोलताना रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले, पुणे विभागातील सध्या सुरू असलेली विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी. मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्यात येत आहे. ती कामे तातडीने पूर्ण करावीत. या मार्गात येत असलेल्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा.जी कामे विभागीय, मुख्यालय स्तरावर करता येतील ती मार्गी लावा. पुणे विभागात जास्तीत जास्त दळणवळण वाढवावे, प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात असे सांगितले.

तसेच रेल्वे विभागात सुरू असलेली विकासकामे, प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधांची कामे, रेल्वे सेवा, गाड्यांना स्टॉपेज देणे, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना भू-संपादन संबंधी मुद्दे, लेवल क्रासिंग गेटच्या आसपास पावसाळ्यात पाणी जमा होण्याची समस्या, रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण समस्यांबाबत रेल्वे राज्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणामुळे बंद पडलेले रस्ते पुन्हा तातडीने सुरू करावेत. रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग यांची कामे पूर्ण करावीत. रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणामुळे अनेक कुटुंबांचे पुनर्वसन करणे गरजेचे झाले आहे. ती जबाबदारी रेल्वेने पार पाडावी. नागरिकांच्या गरजांनुसार रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी लोकप्रतिनिधींनी प्रवासी सुविधा वाढविणे, रेल्वे विकासकामांत येणारे अडथळे याबाबत त्यांनी रेल्वेकडे सूचना मांडल्या. बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, श्रीरंग बारणे, आमदार राहुल कुल, महेश शिंदे, संजय जगताप, भीमराव तापकीर उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button