सांगली : अण्णासाहेब पाटील यांच्या विरुद्धचा दावा फेटाळला | पुढारी

सांगली : अण्णासाहेब पाटील यांच्या विरुद्धचा दावा फेटाळला

सांगली ः पुढारी वृत्तसेवा अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक, कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्याकडून 12 कोटी 26 लाख 73 हजार 296 रुपये व त्यावरील 18 टक्के व्याजासह वसुली करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेला दावा सहकार न्यायालयाने फेटाळून लावला.

कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्याशी संबंधित या पतसंस्थेचे सन 2003 ते 2010 या काळात वैधानिक लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर याचे फेर लेखापरीक्षण विशेष लेखा परीक्षक वर्ग 2, जिल्हा लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था यांनी केले. सन 2010 पर्यंत सतत ऑडिट ‘अ’ वर्ग असणार्‍या या संस्थेवर याच फेर लेखापरीक्षाच्या आधारे 12 कोटी 26 लाख 73 हजार 296 इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा ठपका ठेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपहाराच्या रकमेची व्याजासह संपूर्ण रक्कम अण्णासाहेब पाटील यांच्यासह संबंधितांकडून वसूल करण्याची या दाव्यात मागणी करण्यात आली होती. परंतु, गेल्या साडे पाच वर्षात अनेक वेळा न्यायालयाने पुरेशी संधी देऊनही वादींच्यावतीने साक्षी पुरावे सादर होऊ शकले नाही. अखेरीस सहकार न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस. एस. पोरे यांनी हा दावा चालविण्यासाठी वादी यांची अनास्था दिसून येत असल्याची टिप्पणी करीत संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील व संबंधितांविरुद्धचा दावा फेटाळून लावला.

हेही वाचलतं का?

Back to top button