इथेनॉलनिर्मितीत महाराष्ट्राचा देशात डंका! | पुढारी

इथेनॉलनिर्मितीत महाराष्ट्राचा देशात डंका!

सांगली ; विवेक दाभोळे : साखर कारखानदारीसाठी आता परवलीचा शब्द बनलेल्या इथेनॉलच्या निर्मितीत सलग चौथ्या वर्षी महाराष्ट्राने देशात आपला डंका कायम राखला आहे. मार्च 2022 अखेरच्या सहामाहीमध्ये तर राज्याने 13 कोटी 7 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. याच काळात संपूर्ण देशात 82 कोटी 1 लाख लिटरचे उत्पादन झाले आहे.

इथेनॉलचा वापर आणि उत्पादन याला चालना देण्यासाठी सरकारने थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्याचे धोरण जाहीर केले आहे. महागड्या पेट्रोलसाठी प्रभावी पर्याय म्हणून इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापरास चालना देण्याचे सरकारचे धोरण आहे. ब्राझीलमध्ये पेट्रोलमध्ये 23 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जाते. भारतात उसाच्या रसापासून साखर केल्यानंतर शिल्लक मळीपासून इथिल अल्कोहोल आणि मिथिल अल्कोहोल तयार होते. इथिल अल्कोहोल हेच इथेनॉल म्हणून वापरात येत आहे. जानेवारी 2003 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

आधी पाच टक्के व नंतर दहा टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याची अनुमती दिली. त्यानुसार इथेनॉल ब्लेडिंग प्रोग्राम आखण्यात आला. आता हेच प्रमाण 20 टक्केपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील इथेनॉलचे उत्पादन आणि वापर यातील आघाडी ही साखर उद्योगासाठी दिलासादायक ठरत आहे.

देशात प्रामुख्याने सन 2018-2019 च्या हंगामापासून इथेनॉलच्या उत्पादनास गती आली. 18-19 मध्ये देशात 141 कोटी तीन लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले होते. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षात यात वाढच होत गेली आहे.

सन 2019 – 2020 मध्ये देशात 123 कोटी लिटर, 20-21 मध्ये 222 कोटी 4 लाख लिटर इथेनॉल निर्मिती झाली. आता मार्चअखेर साखर वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशात 82 कोटी 1 लाख लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांत फक्‍त महाराष्ट्राने देशातील उत्पादनाच्या जवळपास 20 टक्के इथेनॉलचे उत्पादन करून आघाडी घेतली आहे.

Back to top button