सांगली : नेत्यांच्या राजकारणात पोलिस, प्रशासन वेठीला | पुढारी

सांगली : नेत्यांच्या राजकारणात पोलिस, प्रशासन वेठीला

सांगली : शशिकांत शिंदे
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या विषयावरून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांतील नेत्यांतील वाद विकोपाला गेला आहे. आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. यातून प्रशासन आणि पोलिस यांनासुद्धा वेठीस धरण्यात येत आहे. नेत्यांच्या या मताच्या राजकारणात सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न मात्र दुर्लक्षित राहत आहेत.

गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेकांचे उद्योग, व्यवसाय अडचणीत आले.अनेकांचे रोजगार गेले. दुकानदार, हॉटेल, बेकरीचालक यासह विविध घटकांना मोठा फटका बसला. त्यातच कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील गावांतील घरांचे आणि शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने बेकायदा सावकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सावकारांकडून अन्याय-अत्याचार सहन करावा लागत आहे. शाळेत जाणार्‍या मुलांची फी कशी भरायची यासह असे अनेक प्रश्‍न सर्वसामान्य जनतेसमोर आहेत. शेतीमालास अपेक्षित दर मिळत नाही. त्या तुलनेत उत्पादन खर्च भरमसाट वाढला आहे. त्यामुळे शेती तोट्यात जात आहे. हे प्रश्‍न नेत्यांनी लक्ष घालून सोडवावेत, ही अपेक्षा जनतेची आहे.

येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महापालिकेने उभारले आहे. या स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिलला होणार आहे. त्या समारंभात आम्हाला विश्‍वासात घेतले नाही, असे सांगत त्याला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यातून जिल्हाधिकार्‍यांनी या परिसरामध्ये संचारबंदी लागू केली. या संचारबंदीचे पालन करण्यासाठी शेकडो पोलिस बंदोबस्तासाठी उभे करण्यात आले. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले. तरी सुद्धा आमदार पडळकर यांच्यासह नेत्यांनी रविवारी स्मारकाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी पोलिस व प्रशासनास आदेश देण्यात आले होते. त्यामुळे भर उन्हात पोलिस, महसूलचे अधिकारी दिवसभर थांबून होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचे हाल झाले.

जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था चिंताजनक

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे. विविध कारणांमुळे बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे लूटमार, चोर्‍या यांचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनता आणि नशेतून किरकोळ कारणावरून सुद्धा खून पडत आहेत. गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.

Back to top button