School Holiday : अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांनाच एप्रिलमध्ये सुट्टी : शिक्षण आयुक्त | पुढारी

School Holiday : अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांनाच एप्रिलमध्ये सुट्टी : शिक्षण आयुक्त

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांच्या सुट्टीवर गदा नाही. मात्र, ज्या शाळांचा कोरोना काळात अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही, अशा शाळांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व परीक्षा घेण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्यात याव्यात, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहे. (School Holiday)

शालेय शिक्षण विभागाने 24 मार्च रोजी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी या वर्गांच्या शाळांसाठी एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्यात याव्यात, अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या परिपत्रकामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे.

शिवाय, परीक्षांचेसुद्धा नियोजन अगोदर झाले आहे, त्या शाळांनी यामध्ये कुठलाही बदल करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर गदा न येता पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याबाबत शाळा स्तरावर नियोजन करावे, असेही म्हटले आहे.

शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवर गदा येणार म्हणून अनेक शिक्षक संघटना आणि पालक संघटना, शिक्षण संघटनांनी परिपत्रक तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

हा गोंधळ दूर करण्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केवळ कोव्हिड काळात काही कारणास्तव अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळांसाठीच हे निर्देश असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय, मे महिन्यात शाळा सुरू ठेवाव्यात, असे कोणतेही निर्देश परिपत्रकात न दिल्याने मुलांच्या सुट्ट्या कमी होणार नाहीत, असेही म्हटले आहे. (School Holiday)

Back to top button