Raigad News : …अन्यथा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उधळून लावू : अनिल नवगणे | पुढारी

Raigad News : ...अन्यथा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम उधळून लावू : अनिल नवगणे

महाड, पुढारी वृत्तसेवा : महाड शहरात शुक्रवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यास विरोध केला होता. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आले होते. या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी न मागितल्यास ६ जानेवारीरोजी लोणेरे येथे होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ठाकरे गट उधळून लावेल, असा इशारा ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी दिला. महाड येथील कार्यालयात आज (दि.२२) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Raigad News

महाडचे आमदार भरत गोगावले यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. याचा निषेध करण्यासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाकडून विरोध केला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यास मज्जाव केला होता. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनीही अप्रत्यक्षपणे सहकार्य केले होते. या पार्श्वभूमीवर नवगणे यांनी हा इशारा दिला आहे. Raigad News

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजीप, माजी उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप- कामत, तालुका प्रमुख राजाभाऊ कोरपे, शहर प्रमुख सुरेश कलमकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अनिल नवगणे म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेबांच्या संदर्भात आमदार गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून व त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्याकरता शिवसैनिक गेले होते. त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच महिला आघाडी कडून विरोध केला होता. त्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलेली साथ दुर्दैवी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यापासून वंचित ठेवल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी, अन्यथा लोणेरा येथील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावेल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button