रायगड : महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू | पुढारी

रायगड : महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू

जयंत धुळप

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही, याची आता लाज वाटते, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्यानंतर 15 वर्षे रखडलेल्या गोवा महामार्गाबाबत कोकणातील अत्यंत सोशीक अशा चाकरमान्यांची मानसिकता नेमकी काय असेल, याची कल्पना न केलेली बरी. शासनाचे पूर्णपणे चुकलेले नियोजन आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे देशात बदनामीचा उच्चांक गाठलेला हा मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प ठरला आहे. दरम्यान, गोवा महामार्गाची एक काँक्रिट मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करणार, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. मात्र, त्याचवेळी महामार्गाच्या दुसर्‍या मार्गिकेवर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.

महामार्गाचे रायगडमध्ये पाऊस असतानाही काम सुरू आहे; मात्र रत्नागिरीत काम पावसाळ्यामुळे बंद आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पनवेल (पळस्पे) ते इंदापूर या 84 कि.मी. अंतराच्या महामार्गाचे काम 86 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा एमएसआरडीसीची व बांधकाम विभागीचा असला तरी एका मार्गीकेच्या काँक्रीटीकरणाचे काम मात्र पळस्पे ते हमरापूर(पेण) इतकेच झाले आहे. हमरापूर ते इंदापूर या सुमारे 40 किमी अंतराचे काम झालेले नसून याच टप्प्यात मोठे खड्डे महामार्गावर आहेत. इंदापूर ते पोलादपूर दरम्याचे काम सुरु आहे. त्यापूढे रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी ते परशुराम घाट टप्प्याचे 95.20 टक्के काम झाल्याचा दावा असला तरी परशुराम घाटातील काम अद्याप पूर्ण झालेले नाही.परशुराम घाट ते आरवली या टप्प्याचे काम 62 टक्के , आरवली ते कांटे टप्पा 22.08 टक्के आणि कांटे ते वाकेड टप्प्याचे काम 24.25 टक्के झाल्याचा दावा असला तरी सद्यस्थिती येथील महामार्ग काँक्रीटीकरणाचे काम बंद आहे. मात्र सिंधूदूर्ग जिल्ह्यातील वाकेड ते झाराप या महामार्ग टप्प्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून वाहतूक देखील सुरळीत सुरु आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी गोवा महामार्गाच्या गंभीर दुरवस्थेची हवाई पहाणी केली आणि गोवा माहामार्गाच्या अकरा टप्प्यातील कामाचे नव्याने नियोजन करण्यात आले. त्याच नियोजनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनीक बाधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोन वेळा गोवा महामार्गाच्या कामाची पहाणी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन केली. आणि त्यांतून फलित निघाले की गणपती पूर्वी गोवा महामार्गाच्या एका मार्गीकेचे काँक्रीटीकरण पूर्ण होऊन ती सुरु करण्यात येईल. आणि कोकणातील चाकरमानी यंदा गणेशोत्सवाकरिता सुखाने आपापल्या गावी पोहोचेल, असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात उतरेल का..अशी शंका शासनाच्याच काही अधिकार्‍यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.यंदाच्या गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांकरिता काँक्रीटची एक लेऩ सुरू होणार आहे.

गोवा महामार्गावरील पोलादपूर(रायगड) आणि खेड(रत्नागिरी) या दरम्यान बोगदा हा अत्यंत महत्त्वाचा बोगदा असून त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि कशेडी घाटातील अपघातांचा धोका दूर होऊ शकणार आहे. हा बोगदादेखील गणपतीपूर्वी सुरु होईल असे सार्वजनीक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी जाहिर केले आहे. परंतु या बोगद्याचे काम विशेषतः त्यांचे अ‍ॅप्रोच रोडचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याच बरोबर या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे सुरक्षा पमाणपत्र मिळणे हे महत्त्वाचे असल्याचे प्रशासनातील अधिकार्‍यांनी सांगत्त्िातले. हे बोगद्याचे काम पूर्ण होऊन सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले तरच बोगद्यातूून वाहतूक सुरू होऊ शकणार आहे.

गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा कोकणातील माणसाच्या मनात एक समाधानाची भावना निर्माण झाली होती. दुरवस्थेतील या महामार्वर झालेल्या तीन हजारवरील अपघातांमध्ये आता पर्यंत चार हजारच्या आसपास लोकांना जीव गमवावे लागले, तर दहा हजारपेक्षा अधीक लोकांच्या पदरी कायमचे अपंगत्व आले. त्यातून जनक्षोभ निमार्ण झाला. पत्रकार संघटनांची आंदोलने झाली. स्थानिकांनी न्यायालयात दाद मागीतली, याचिका दाखल झाल्या. आणि या सार्‍या रेट्यामुळे अखेर केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात नव्याने नियोजन होऊन महामार्गाचे काम सन 2011 मध्ये पुन्हा गतीने सुरू झाले. सन 2011 ते 2022 या अकरा वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष महामार्गाचे काम कमी आणि कोर्टांतील यांचीक आणि आंदोलनेच अधीक अशी परिस्थिती होती. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी राज्य शासनाला या महामागर्गाची आठवण व्हायची आणि त्यात्या वेळचे मुख्यमंत्री आश्वासने द्यायचे आणि गणेशविसर्जनाच्या दिवशी या आश्वासनांचे विसर्जन व्हायचे.

या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय उपाध्ये यांनी रायगड जिल्हा न्यायालयात तर मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकांच्या सूनावणीच्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कामाचे वास्तव उघड झाले. ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे झाले आहे त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. रस्ता वाहातुकीसाठीअसुरक्षित ठरला असून त्यात सतत निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडीची भर पडत असल्याने हा महामार्ग पुन्हा जीवघेणा बनला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात अनेकदा चर्चा झाली पण मुंबई -गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सूनावणीत गोवा महामार्गाच्या 11पैकी तीन टप्प्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग 2024 मध्ये पूर्ण होईल असे म्हटले होते. महामार्ग टप्पे आणि पुर्ण झालेल्या कामाचे प्रमाण नमुद केले होते.मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड ते झाराप हा 118 किमीचा महामार्ग एप्रिल 2022 मध्ये तयार झाला आहे. सध्या या महामार्गावरून वेगाने वाहनांची ये-जा सुरू आहे. परंतू उर्वरित टप्प्यात पुन्हा महामार्गाची दुरवस्था होऊन महाकाय खड्डे झाले आहेत.

Back to top button