रायगड : पोलीस भरतीकरिता आलेल्या दोन उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये | पुढारी

रायगड : पोलीस भरतीकरिता आलेल्या दोन उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये

अलिबाग; पुढारी वृत्त्तसेवा : पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे औषधी द्रव्य सापडले. यातील एका उमेदवारीची मैदानी चाचणी शनिवारी (दि.७) झाली तर दुसर्‍या उमेदवारीची चाचणी रविवारी (दि.८) होणार होती. मात्र त्यांची मैदानी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवारीचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकिय तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांना नाईक आळी येथील एका कॉटेजमध्ये पोलीस भरती मैदानी चाचणीकरीता आलेल्या काही उमेदवारांकडे औषधीद्रव्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या कॉटेजमध्ये तिघेजण राहत होते. त्यामधील दोघेजण भरती प्रक्रीयेसाठी आले होते.

तर त्यातील एक त्यांच्यासोबत आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता एक ग्रे रंगाचे चैनचे पाउच मिळून आले. त्यामध्ये दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन असे नाव असलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या ४४ डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन ३२ एनच्या नीडल्स, एक बीडी यू ४० इन्सुलिन असे नाव असलेली सिरींज नीडलसह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले अशा प्रकारचे साहित्य मिळून आले.

याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता मैदानी चाचणीच्या अगोदर या गोळया, औषधे घेतल्यास त्याचा फायदा मैदानी चाचणीसाठी होत असल्याचे त्यांनी सांगीतले. या घटनेची चौकशी अलिबाग पोलीस करीत असुन चौकशीमध्ये पुरावे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

औषधीद्रव्य व गोळयांचा वापर मैदानी चाचणीच्यापूर्वी केला जात असल्याने सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही व्यक्तींचे जिल्हा सामान्य रूग्णालय, अलिबाग येथील वैद्यकीय अधिकार्‍यांच्याकडून रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई व नवी मुंबई येथे पाठविण्यात येत आहेत. तुर्तास तिन्ही व्यक्तींना सोडून देण्यात आलेले असून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामधील निष्कर्शावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेले कोणतीही वस्तु वा पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेला सामोरे न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जे उमेदवार असे गैरप्रकार करताना आढळुन येतील त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक

हेही वाचा;

Back to top button