रायगड अपघात : मुंबईकडे निघालेल्‍या भरधाव कारची ट्रकला धडक; २ ठार, १० जखमी | पुढारी

रायगड अपघात : मुंबईकडे निघालेल्‍या भरधाव कारची ट्रकला धडक; २ ठार, १० जखमी

खोपोली; पुढारी वृत्‍तसेवा : सोमवारी पाच दिवसांच्या गणपती बाप्पा आणि गौराईला निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांनी
मुंबईच्या दिशेने वाट धरली आहे. खासगी वाहनांची प्रवासी वाहून नेण्यासाठी चढाओढ असते, मात्र क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताची शक्‍यता अधिक असते. असाच एक अपघात मुंबई-पुणे एक्स्‍प्रेस वेवर झाला. मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील जवळपास 15 प्रवासी मुंबई कोपरखैरणेच्या दिशेने प्रवास करत होते. रात्रीच्या दरम्यान माडप बोगद्याजवळ एक पंचर काढण्यासाठी ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा होता. या ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या इको कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले, तर 10 जण गंभीर जखमी झाले.

त्यांना तात्काळ एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या भीषण अपघाताची गंभीरता लक्षात घेत खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार तसेच पळस्पे आणि खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या अपघाताच्या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी आपल्या रोजीरोटीसाठी मुंबईची वाट धरत असतात. रात्री सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे मारुती इको कार मधून चालक अंकुश राजाराम जंगम व इतर 15 जण निघाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने माडप बोगद्याजवळ सदर कार आली असता, KA 56 – 2799 हा ट्रक रस्त्याच्या कडेला ट्रक पंक्चर झाल्याने टायर बदलण्यासाठी उभा होता. त्याला इको कारने मागून धडक दिली.

धडक एवढी गंभीर होती की, इको कार मधील सर्वच प्रवाशांना जबर मार लागला. त्यातील महिला लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर, (वय 24) व गणेश बाळू कोंढाळकर, (वय -22), रा. कोंढावळे, ता. वाई, जिल्हा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 10 जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यातील सहा ते सात जणांना जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. इको कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आय आर बी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणा यांनी मेहनत घेऊन प्रवासी वर्गाला मदत केली. अपघात झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेंसोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते.

सदर अपघाताची भीषणता लक्षात घेता खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. इको कारचा चालक अंकुश राजाराम जंगम (वय 32) याने लेनची शिस्त न पाळता, भरधाव वेगाने कार चालवल्याने हा अपघात झाल्याचे कारण प्राथमिक स्वरूपात पुढे आले आहे. पोलीस यंत्रणा याबाबत अधिक चौकशी जरी करत असली तरी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अती वेगाने कार चालवल्याने झालेल्या या भीषण अपघाताचे स्वरुप पाहता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button