टाकळी ढोकेश्वर : शिंदे-फडणवीस सरकारचे जहाज कधीही बुडू शकते: आमदार नीलेश लंके | पुढारी

टाकळी ढोकेश्वर : शिंदे-फडणवीस सरकारचे जहाज कधीही बुडू शकते: आमदार नीलेश लंके

टाकळी ढोकेश्वर; पुढारी वृत्तसेवा: शिंदे-फडणविस सरकार अपघाताने आले असून या सरकारचे जहाज कधीही बुडू शकते, असा टोला आमदार नीलेश लंके यांनी लगावला. पारनेर तालुक्यातील मांड ओहोळ येथे जलपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अभियंता व्ही. टी. शिंदे, बा. ठ. झावरे यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, शाखा अभियंता अभिजित मोरे, भागूजी झावरे, सरपंच पियुष गाजरे, कारभारी पोटघन, सतीश भालेकर, सरपंच प्रकाश गाजरे, रावसाहेब झावरे, सरपंच आप्पासाहेब शिंदे, सुभाष ढोकळे, सरपंच राहुल झावरे आदी उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून मांड ओहोळ धरण 4 वेळा भरले. माझ्या जीवनातील हा योगायोग आहे. पावणे तीन वर्षांत 4 वेळा जलपूजनाचा मान मिळाला. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु विकास हा हनुमानाची शेपटी आहे. येणार्‍या काळात पाणी व रस्त्यांसह विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या जलपूजनाने बळीराजा सुखी झाला, याचे मला मोठे समाधान आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारात नीलेश लंके हे वारंवार सांगत होते की, पारनेर तालुक्यातील अनेक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. निवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवशी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यावेळीही आमदार लंके यांनीच जलपूजन केले होते. ऑगस्ट 2020 ऑक्टोबर 2021 सप्टेबर 2022 मध्ये मांडओहोळ पूर्ण क्षमतेने भरले. या प्रत्येक वेळी आमदार लंके यांच्या हस्ते जलपूजन झाल्याबद्दल चर्चेस उधाण आले आहे.

आमदार लंके यांचा पायगुण चांगला
पारनेर तालुक्यासह परिसराला वरदान ठरणारे मांडओहोळ धरण 4 वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. चार वेळेस जलपूजनाचा मान मिळालेले आमदार नीलेश लंके एकमेव आहेत. त्यावरून त्यांचा पायगुण चांगला असल्याचे गुरूदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे व बाजार समिती संचालक अशोक कटारिया म्हणाले.

Back to top button