Leopard attack series: बिबट्यांच्या हल्ल्यांनी गावकऱ्यांचा दहशत; पिंपरखेड-मन्चर परिसरात गुन्हेगारी वातावरण
मंचर : आंबेगाव तालुक्यातील खडकी गावाजवळ शनिवारी (दि. 11) रात्री बिबट्याने अचानक हल्ला चढवून थरार माजवला. या हल्ल्यात नीलम वाबळे ही तरुणी जखमी झाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.(Latest Pune News)
नीलम वाबळे ही चाकण (ता. खेड) येथून चुलते सचिन वाबळे यांच्यासोबत दुचाकीवरून खडकीकडे परतत होती. रात्रीच्या अंधारात खडकी पुलाजवळ रस्ता ओलांडणारे एक छोटे पिल्लू दिसल्याने सचिन यांनी मांजरीचे पिल्लू समजून दुचाकीचा वेग कमी केला. त्याच क्षणी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून दोघांवर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यात नीलम या दुचाकीवरून खाली पडल्या. बिबट्याने त्यांना ओरबडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या पाठीवरील सॅकवर पंजा लागला. त्यातच पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाच्या प्रकाशामुळे बिबट्या अंधारात पसार झाला. यामध्ये नीलमच्या डाव्या हाताला नख्या ओरखडल्याने जखम झाली. घटनेनंतर तिला तत्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांत बिबट्यांच्या हालचालींनी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याने भीमाशंकर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दादाभाऊ पोखरकर आणि बाजार समितीचे माजी सदस्य दत्ता हगवणे यांनी तातडीने वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
अष्टापूर परिसरात बिबट्यांचा वाढता संचार
कोरेगाव मूळ : अष्टापूर (ता. हवेली) आणि परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, ग््राामस्थांत तीव भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या रस्त्याच्या कडेला आणि शेतामध्ये फिरणाऱ्या या बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
माळवाडी परिसरातील शेतकरी भाऊसाहेब बाळू कटके यांच्या शेतात गावरान कोंबड्यांचा छोटा व्यवसाय आहे. दररोज रात्री बिबट्या त्यांच्या शेडजवळ येऊन बसत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर पोपट दत्तात्रय कोतवाल यांच्या शेतातील गाई बांधलेल्या शेडमध्ये भरदुपारीच बिबट्या बसलेला दिसल्याने गावात मोठी खळबळ उडाली.
परिसरातील अनेक पाळीव कुत्री बिबट्याने ठार केल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाण्यासही घाबरू लागले आहेत. परिणामी शेतीचे काम ठप्प होऊन शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
ग््राामस्थांनी वारंवार वन विभागाला या संदर्भात माहिती दिली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला असून, ’बिबट्याने माणसावर हल्ला केल्यावरच वन विभागाचे डोळे उघडणार का?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव दादा कोतवाल, अष्टापूरच्या सरपंच पुष्पा सुरेश कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, उपसरपंच संजय कोतवाल, माजी उपसरपंच दत्तात्रय कटके तसेच राजेश सुदाम कोतवाल यांनी वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
बिबट्याच्या नसबंदी कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
मंचर : बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे निर्माण झालेल्या समस्येवर शाश्वत उपाययोजना म्हणून बिबट्या नसबंदी कायदा आणण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या कायद्यामध्ये बिबट्यांची नसबंदी करण्याची तरतूद नाही. त्यामुळे राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून, तो मंजूर करून घेण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 12) दिली.
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बालिका शिवन्या बोंबे हिच्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे तिचे निधन झाले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला असता तेथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, बिबट्याच्या विषयावर तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्या-मानवी संघर्षामुळे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी आणि त्यांच्या पशुधनावर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब आहे.
यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मलठण येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुरक्षेसाठी आणि बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक असलेल्या पिंजऱ्यांच्या व्यवस्थेकरिता तातडीने दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यामध्ये सुमारे 200 पिंजऱ्यांची व्यवस्था केली जाईल तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
आम्हाला बिबटे मारण्याची परवानगी द्या!
शिवन्याच्या मृत्यूनंतर ग््राामस्थ आक्रमक; रुग्णवाहिकेसह बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर आंदोलन
पिंपरखेड : पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. यानंतर पिंपरखेड परिसरातील संतप्त नागरिकांनी मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका अडवून बेल्हे ते जेजुरी राज्य मार्गावर आंदोलन केले. या वेळी ’तुमचे बिबटे घेऊन जा, नाहीतर आम्हाला बिबटे मारण्याची परवानगी द्या!’ असे म्हणत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी धारेवर धरले.
बेट भागात गेल्या पंधरा वर्षांपासून बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. रविवारी (दि. 12) सकाळी शिवन्या बोंबे या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील ही मृत्यूची सातवी घटना आहे. मात्र वनविभाग याची गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे पिंपरखेड, काठापूर, जांबूत, चांडोह येथील नागरिकांनी रास्तारोको केला. तसेच सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस व शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना जाब विचारत आपला संताप व्यक्त केला.
या वेळी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी स्मिता राजहंस यांनी 14 तारखेला जिल्हाधिकारी वनमंत्री यांचे सचिव यांच्याबरोबर बैठक आहे. आपले दोन प्रतिनिधी घेऊन या विषयावर चर्चा करू असे सांगितले. मात्र त्यास ग््राामस्थांनी नकार दिला. आमचे कोणीही तिकडे येणार नाही. जिल्हाधिकारी आणि वनमंत्री यांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी येऊन बिबट्यांच्या बंदोबस्ताचा निर्णय घ्यावा. अन्यथा बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर तीव आंदोलन करू, असा इशाराही दिला.
या वेळी स्मिता राजहंस यांनी जिल्हाधिकारी व वनमंत्री यांचे प्रतिनिधी यांना पिंपरखेड येथे आणण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिवन्याचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पैसे देतो बाळ परत द्या..
‘आधी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय करणार ते सांगा. जीव गेल्यावर पिंजरे लावून काय फायदा? आम्हाला जीव मुठीत धरून शेतात काम करावे लागते. आमची मुले तुमच्या मुलांसारखी नाहीत का? यापूर्वी जीव गेलेल्या घटना घडल्यावर वनविभागाने काय उपाययोजना केल्या? तुम्ही जीवाची किंमत पैशात करता, आम्ही पैसे देतो आमचं बाळ आम्हाला परत देणार का? तुमच्या बिबट्याची किंमत सांगा, आम्ही बिबट मारून तेवढे पैसे देतो. तुमचे बिबटे तुम्ही तुमच्या जागेत बंदिस्त करून ठेवा. आमच्या जीवावर सोडू नका. बिबट्याला कायद्याचे संरक्षण, त्याला मारू नका, मारले तर शिक्षा होते. तर त्याने आमचा जीव घेतल्यावर काय? देशात राजकीय नेत्यांसाठी कायदा एका तासात बदलला जातो, पण माणसाचा जीव घेणाऱ्या बिबट्यांसाठी कायदा बदलत का नाही? अशा संतप्त भावना व्यक्त करत प्रश्नांचा भडीमार केला.
बिबट्याला पकडण्यासाठी 11 पिंजरे
मंचर : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी 11 पिंजरे लावण्यात आले आहेत. लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे दोन लाईव्ह कॅमेरे व चार ते पाच ट्रॅप कॅमेरे लावले आहेत, अशी माहिती शिरूर वनक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली.
रविवारी सकाळी दहा वाजता शिवन्या बोंबे या लहान मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी वनक्षेत्र अधिकारी गव्हाणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी 11 पिंजरे लावण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दोन लाईव्ह कॅमेरे व चार ते पाच ट्रॅप कॅमेरे लावत आहोत. लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यात येईल.

