

पुणे : पाऊस थांबताच शहरातील प्रदूषण वाढले आहे. दिवाळी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने वाहने घराबाहेर काढतात. या वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. प्रखर ऊन, धुलीकण वाढल्याने शहरातील हवा अशुद्ध गटांत गेली आहे. रविवारी शहरातील शिवाजीनगर, लोहगाव, स्वारगेट, बाजीराव रस्ता, मंडई परिसर या भागात रविवारी नागरिकांना प्रदूषणाचा खूप त्रास जाणवला.(Latest Pune News)
यंदा शहरात मे महिन्यापासूनच पाऊस सुरू होता. त्यामुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण खूप कमी झाले होते. जून, जुलै, ऑगस्ट अन् सप्टेंबरमध्येही तीच स्थिती होती. यंदा शहरात एकूण चार महिने सतत पाऊस सुरू असल्याने हवा प्रदूषणाचा फारसा त्रास जाणवलाच नाही. मात्र ऑक्टोबर सुरू होताच पाऊस कमी झाला अन् हवा प्रदूषणात वाढ झाली. प्रामुख्याने दिवाळीची गर्दी बाजारात वाढली, सर्वंच प्रकारच्या वाहनांची वाहतूक कोंडी शहरात होत असल्याने इंधन ज्वलनातून तयार होणारे प्रदूषण वाढले आहे.
पाऊस थांबताच शहराचे कमाल तापमान 32 ते 33 अंशावर गेले असून लोहगावचे कमाल तापमान रविवारी 33 अंशार होते. तर शिवाजीनगरचे तापमान 32 अंश सेल्सिअस इतके होते. त्यात वाहनांची गर्दी वाढल्यामुळे त्यातून निघणाऱ्या 10 पीएम व 2.5 पीएम या सूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण शहरात सर्वत्र वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी गर्दीच्या ठिकाणी हवेची गुणवत्ता खूप खराब आढळून येत आहे.