

बिबवेवाडी : ऐन सणासुदीच्या दिवसांत स्वामी विवेकानंद पदपथावरील इंदिरानगर चौक ते अप्पर डेपोपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी फटाका स्टॉल व अनधिकृत हातगाडी पथारी स्टॉलधारक इत्यादींच्या अतिक्रमणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहे. याबाबत महापालिकेचे अतिक्रमण खाते, बांधकाम नियंत्रण व आकाशचिन्ह विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे.(Latest Pune News)
गणेशोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत विवेकानंद रस्त्यासह अनेक ठिकाणी विविध कारणांनी पदपथावर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत भागात छोट्या- मोठ्या विक्रेत्यांनी जागा व्यापून पादचाऱ्यांसह वाहनचालकांची डोकेदुखी वाढवून ठेवली आहे. त्यातच दिवाळी सणासाठी ठिकठिकाणी फटाका दुकाने उभारून नागरिकांची सुरक्षितता धोक्यात घातली आहे. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण खात्याकडे काही स्थानिक नागरिकांनी तक्रार दिली असता कारवाईसाठी मोठा फौजफाटा आला, पण कारवाई न करता हात हलवत परत माघारी गेल्याने स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
ऐन दिवाळीच्या अगोदर पदपथावर उभारण्यात येणाऱ्या फटाका दुकानांसाठी अग्निशामक दल, आकाशचिन्ह विभाग, पोलिस प्रशासन व महापालिकेचा अतिक्रमण विभाग इत्यादीकडून रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु, राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे कार्यकर्त्यांची दुकाने बिनधास्तपणे उभारली जातात. दाखवण्यापुरती कारवाई केली जाते. पण, एखादी दुर्दैवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. मुख्य रस्त्यावर अशा व्यवसायांना परवानगी देणे उचित नाही. महापालिकेच्या मोकळ्या मैदानावर किंवा खासगी मैदानावर फटका स्टॉलला परवानगी देणे उचित ठरेल.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनेक रस्त्यावरील ज्या- ज्या अनधिकृत ठिकाणी फटका स्टॉल व अतिक्रमणे वाढलेली आहेत, अशा अनधिकृत दुकानांवर येत्या दोन दिवसात संयुक्त कारवाई केली जाणार आहे. तसे प्रशासनाच्या विविध विभागांना कळविले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. व्यावसायिकांनी मोकळ्या मैदानात अधिकृत परवाना घेऊन व्यवसाय करावा.
कैलास केंद्रे, सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे महापालिका
गेल्या काही दिवसांपासून बिबवेवाडी परिसरात अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना व ज्येष्ठ नागरिकांना पदपथावरून चालणेही अवघड झाले आहे. महेश सोसायटी चौक परिसर पूर्णतः अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. महापालिकेने तातडीने याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे.
रामविलास माहेश्वरी, स्थानिक रहिवासी, महेश सोसायटी पुणे