

पुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर असलेल्या विकेंडच्या सुटीचा फायदा घेत पुणेकरांनी रविवारी (दि. 12) मंडई परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.(Latest Pune News)
आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, किल्ले आणि अन्य पूजा साहित्यासाठी पुणेकर कुटुंबीयांसह मध्यवस्तीत उतरले. यामुळे मध्यवस्तीतील मंडई, रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रोड आणि आसपासच्या परिसरांत वाहतूक कोंडी झाली. मात्र, या कोंडीवर मात करण्यासाठी अनेक पुणेकरांनी यावर्षी मेट्रोने मंडई गाठण्याचा स्मार्ट निर्णय घेतल्याचेही दिसले. परिणामी, मंडई मेट्रो स्थानक परिसरात गर्दी दिसली.
मध्यवस्तीतील गर्दी पाहून अनेकांनी स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, कोथरूड, वनाज, रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड अशा विविध मेट्रो स्थानकांवर स्वतःची वाहने लावून थेट मंडई मेट्रो स्थानकावर उतरणे पसंत केले. परिणामी, रविवारचा दिवस असल्याने मंडई मेट्रो स्थानक आणि परिसरात प्रवाशांची लक्षणीय गर्दी दिसून आली. मध्यवस्तीत वाहन आणून वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी मेट्रोचा वापर करण्यावर भर दिल्याचे दिसले.
वाहतूक कोंडीमुळे मध्यवस्तीत यायला खूप कंटाळा येतो. पण, मेट्रोमुळे आमचे काम खूप सोपे झाले. स्टेशनवर गाडी लावली आणि दहा मिनिटांत मंडईत पोहचलो. ही दिवाळी खऱ्या अर्थाने प्रदूषणमुक्त आणि तणावमुक्त झाली आहे.
सुप्रिया साबळे, खरेदीसाठी आलेल्या महिला