

पुणे : पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सुमारे 2 लाख 62 हजार बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 1350 पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. यामध्ये 54 दवाखाने, 19 प्रसूतिगृहे, 65 आरोग्यवर्धिनी केंद्रे, तसेच वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकाम स्थळे आणि अतिजोखमीच्या भागांचा समावेश होता.(Latest Pune News)
लसीकरण मोहिमेचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप चंद्रन यांच्या हस्ते कै. कलावती मावळे दवाखान्यात सकाळी 8 वाजता करण्यात आले. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे, डॉ. अरविंद मखर, डॉ. प्रदीप पवार तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. चेतन खाडे उपस्थित होते.
रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मोहिमेत 3,12,755 बालकांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, त्यापैकी 2,62,088 बालकांना (84%) पोलिओ डोस देण्यात आले. प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ आणि उद्याने येथे 86 ट्रान्झिट टीम व 37 मोबाईल टीम नेमण्यात आल्या. या टीम्सद्वारे 20,730 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
राज्य शासनाकडून पुणे महानगरपालिकेस 4 लाख पोलिओ डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी 2,70,205 डोस वापरले गेले. या मोहिमेसाठी विविध स्वयंसेवी संस्था, मेडिकल व नर्सिंग कॉलेजेस तसेच रोटरी आणि लायन्स क्लब यांनी सहकार्य केले. ज्या बालकांना रविवारी लस देता आली नाही, त्यांच्यासाठी विशेष घरगुती मोहिम पुढील 5 दिवस राबविण्यात येणार असून, यासाठी 1912 टीम्स व 320 सुपरवायझर्स शहरभर कार्यरत राहतील.