

चाकण : चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दसऱ्याच्या दिवशी नाणेकरवाडी येथे श्रीराम मंडळ या दांडियाच्या मंडळाजवळ रिक्षाने कट मारला यामुळे हत्यारांनी हल्ला झाल्याची घटना घडली होती.(Latest Pune News)
यातील फरारी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी दांडिया पाहण्यासाठी जाताना फिर्यादी श्रीकांत शिंदे याच्या रिक्षाने कट मारला यावरून वाद झाला होता. यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी कोयत्याने फिर्यादी शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठ अधिका-यांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना पकडण्याच्या सूचना चाकण तपास पथकाला दिल्या होत्या. यातील गुन्हेगार हे रेकॉर्डवरील होते. स्वतःचे अस्तित्व लपवून ते राहत होते. चाकण पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलिस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, अंमलदार सुनील भागवत, महादेव बिक्कड, किरण घोडके, रेवण खेडकर, अमोल माटे, शिवाजी लोखंडे, शरद खेरणार, महेश कोळी चाकण परिसरात शोध घेत होते.
गोपनीय माहितीवरून यातील संशयित रणजित येरकर, ओम नाणेकर, स्वप्निल कांबळे, हरिओम नाईकवाडे (सर्व रा. नाणेकर वाडी चाकण) यांना मुखेड (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील पेट्रोल पंपावरून ताब्यात घेतल्याची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.