

पुणे : आमच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाही. त्याबद्दल आम्हांला त्यांना नोटिस काढावी लागेल, असे मी काल सांगितले होते.(Latest Pune News)
त्यानुसार आता नोटिस काढली आहे. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद, सदस्य असता. त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काहीही बोलायला लागला तर कोणताच पक्ष सहन करणार नाही. म्हणून नोटिस दिली असून त्यांचे काय उत्तर येते ते पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाच्या बैठकीसाठी रविवारी (दि. 12) पवार आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नावेळी आ. जगताप यांच्याबाबत पक्षाची भूमिका आणि केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. दरम्यान, पूरग्रस्त भागांत काही ठिकाणी उसाचे मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात नुकसान झाले आहे.
व्हीएसआयमध्ये जयंत पाटील, विश्वजित कदम, खा. विशाल पाटलांमध्ये गुफ्तगू व्हीएसआयच्या विविध विषयांवर झालेल्या सादरीकरण बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची बंद दाराआड बैठक झाली. बराच वेळ ही बैठक चालली. मात्र, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले. या बैठकीनंतर आ. कदम व खा. पाटील यांच्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत सांगली जिल्ह्यातील राजकारणावर खलबते झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.