येडगाव धरणातून 20 दिवसांचे आवर्तन सुरू : पाच तालुक्यांना फायदा | पुढारी

येडगाव धरणातून 20 दिवसांचे आवर्तन सुरू : पाच तालुक्यांना फायदा

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणाच्या डावा कालव्यातून 1400 क्युसेकने पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यांतील करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर आणि जुन्नर या पाच तालुक्यांसाठी 20 दिवसांचे आवर्तन 30 मेपासून सुरू करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली. दरम्यान, या कालव्यातून कुकडी नदीपात्रात देखील पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पिंपळवंडी, वडगाव, कांदळी, साळवाडी, बोरी, साकोरी, निमगाव सावा व त्यापुढील कुकडी नदीकाठच्या शेतकर्‍यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे.

पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठ्यातील पाणी येडगाव धरणात आणल्याने या धरणाची पाणीपातळी 55 टक्के झाली आहे. कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. वेळेवर पाऊस झाला नाही, तर शेतपिकाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. वडज व माणिकडोह धरणांत पाण्याचा साठा खूपच कमी असल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत. तसेच, आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची मोठी कुचंबणा होत आहे.

मी आमदार झाल्यापासून जुन्नर तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणी वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यामुळे कोणालाही पाणी कमी पडू दिले नाही. पाऊस पडेपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा पाचही धरणांमध्ये आहे. पाऊस लेट झाला, तरी काही प्रमाणामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. तथापि, शेतकर्‍यांनी निश्चिंत राहावे. पावसाला वेळेवर सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिल्याने पाण्याची चिंता भासणार नाही.

अतुल बेनके, आमदार जुन्नर

कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा

सध्या कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणात 55 टक्के, माणिकडोहमध्ये अवघा 2.08 टक्के, वडजमध्ये 6.57 टक्के, पिंपळगाव जोगामध्ये -31.47 टक्के इतका पाणीसाठा आहे. डिंभेत 3.61 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. चिल्हेवाडी धरणामध्ये 12.67 टक्के, विसापूरमध्ये 2.57 टक्के, तर घोड धरणामध्ये -0.46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

हेही वाचा

Back to top button