गणेश मंडळांसह नवरात्रोत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळांना जाहीर पाठिंबा | पुढारी

गणेश मंडळांसह नवरात्रोत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळांना जाहीर पाठिंबा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रोत्सव आणि ढोल-ताशा पथक यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. गणेश मंडळांचा कार्यकर्ता संसदेत गेला पाहिजे. त्या माध्यमातून पुण्याच्या प्रश्नांसमवेत गणेश मंडळांचे प्रश्न शासनदरबारी जातील आणि ते सुटतील, अशी भावना मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी या वेळी व्यक्त केली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या पुढाकाराने प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शैलेश टिळक, राहुल जाधव, नितीन पंडित, विकास पवार, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे, नीलेश वकील, संजीव जावळे, युवराज निंबाळकर, नवनाथ पठारे, हेमंत रासने, राजेंद्र अण्णा देशमुख, प्रवीण तरडे, अजय भोसले, आनंद सागरे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बालन म्हणाले, या मेळाव्याचे आयोजनानंतर मला अनेकांनी विचारले की, तुम्ही भाजपचे काम करता का? त्यावर मी कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यकर्ता नाही तर गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. मोहोळ हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते असून ते माझे मित्र आहेत. राजकीय, सामाजिक असो अथवा कोविड, स्वाईन फ्लू असे साथीचे आजार असोत मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरतो. त्यामुळे येत्या 13 मे ला कोणावरही दबाव न आणता जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन बालन यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी म्हणाले, सास्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि आयटी अशा सर्वच क्षेत्रात पुण्याचा देशभरात लौकिक आहे. हा लौकिक वाढवायचा असेल तर मंडळाचा कार्यकर्ता संसदेत पाहिजे, त्यासाठी आपल्याला मोहोळ यांना पाठिंबा द्यावा लागेल. ढोल-ताशा महासंघाचे पराग ठाकूर म्हणाले, मंडळांप्रमाणेच ढोल-ताशा पथकांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपला खासदार हवा आहे. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, शैलेश टिळक, अभिनेते प्रवीण तरडे, धीरज घाटे यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत मोहोळ याना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

दहा वाजले आणि माईक बंद झाला

गणेशोत्सवात नियमांचे पालन करणार्‍या मंडळांनी या बैठकीतही नियमांचे पालन केले. बैठक सुरू असताना आणि पदाधिकारी स्टेजवर बसून बोलत असताना घड्याळात 10 वाजले. या वेळी आयोजकांनी आचारसंहितेचे पालन करीत लगेचच माईक आणि स्पीकर बंद केले. स्टेजवर बसलेली मंडळी खाली येऊन जेवणावळीत ही बैठक पार पडली.

हेही वाचा

Back to top button