मी शरद पवार यांचा मुलगा नाही म्हणून..: अजित पवारांचे विधान चर्चेत | पुढारी

मी शरद पवार यांचा मुलगा नाही म्हणून..: अजित पवारांचे विधान चर्चेत

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : प्रत्येकाचा काळ असतो, 80 वर्षांच्या पुढे गेल्यानंतर कुणाला तरी संधी दिली पाहिजे. मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती की नाही, मिळालीच असती. फक्त मी शरद पवार यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, हा कसला न्याय म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत खंत व्यक्त केली. राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक असल्याचे मी शरद पवार यांना सांगितले होते मात्र तरीही त्यांचा हट्ट काही संपत नव्हता. या शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या टिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले.

केंदूर (ता. शिरूर) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शरद पवार यांची कार्यपद्धती व बदलती भूमिका, याबाबत अजित पवार यांनी परखड भाष्य केले. ते म्हणाले की, 2019 मध्ये भाजपसोबत जायचे ठरले. त्यासाठी मला भाजप नेत्यांसोबत बैठका घ्यायला लावल्या, भाजपबरोबर तब्बल सहा बैठका झाल्यावर मला शिवसेनेसोबत जायचे आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तब्बल 32 वर्षे शरद पवार यांच्यासाठी जी हुजूर म्हणून काम करत राहिलो. मात्र, राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक असल्याचे मी त्यांना सांगितले, तरीही त्यांचा हट्ट काही संपत नव्हता. या सर्व घडामोडींना वैतागूनच अखेर मी निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले.

काय मिळाले याचा हिशेब करा  : सुप्रिया सुळे

मला आता अजित पवारांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळाले याचा हिशेब करा. मला काय मिळाले आणि दादांना काय काय मिळाले. सगळे तुमच्या समोर आहे. सगळे स्पष्ट होईल. त्याचे खूप सोपे उत्तर मिळेल, असे म्हणत अजित पवारांच्या विधानाला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले. शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

हेही वाचा

Back to top button