loksabha election | बारामतीत दोन्ही पवारांकडून भावनिक वातावरण..! | पुढारी

loksabha election | बारामतीत दोन्ही पवारांकडून भावनिक वातावरण..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामतीत मतदानाच्या दिवशी सकाळीच पवार कुटुंबातील भावनिक राजकारण उफाळून आल्याचे चित्र दिसले. बारामतीतील आजचा मतदानाचा दिवस हा पवार कुटुंबीयांनी भावनिक पातळीवर नेऊन ठेवला. आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मातोश्री आशाताई यांना घेऊन पत्नीसह मतदान केंद्रावर धडकले आणि तिथे त्यांनी पत्रकारांना सांगितले की, माझी आई माझ्यासोबत आहे, तिचा मला आशीर्वाद आहे. हे वृत्त पसरताच सुप्रिया सुळे यांनी थेट काटेवाडीतील अजित पवार यांचे घर गाठले आणि आशाताईंची भेट घेतली. बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मी नेहमीच त्यांच्याकडे येत असते आणि आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये वावड्या उठत होत्या की, प्रचाराच्या अखेरच्या सांगता सभेत अजित पवारांच्या आई आशाताई या सुप्रिया सुळे यांच्या व्यासपीठावर दिसतील. या वावड्या खोट्या ठरवण्यासाठी मंगळवारी सकाळीच अजित पवार हे मातोश्रींसह मतदान केंद्रावर आले. बारामतीची निवडणूक ही भावनिक पातळीवर नेली जाईल आणि मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला जाईल, हा धोका अजित पवार संपूर्ण प्रचार सभांमध्ये वारंवार सांगत होते, ते वारंवार मतदारांना आवाहन करत होते’ तुम्ही भावनिक बनू नका, विकासाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मतदान करा’, मंगळवारी मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही सकाळीच ही निवडणूक भावनिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

Back to top button