जन्मपूर्व, विवाहपूर्व तपासणी बनली आव्हानात्मक; थॅलेसेमिया रुग्णांची सर्वाधिक संख्या भारतात | पुढारी

जन्मपूर्व, विवाहपूर्व तपासणी बनली आव्हानात्मक; थॅलेसेमिया रुग्णांची सर्वाधिक संख्या भारतात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जागतिक स्तरावर थॅलेसेमिया रुग्णांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. थॅलेसेमिया हा आनुवंशिक रक्ताचा विकार आहे. रक्ताच्या नात्यांमधील किंवा विशिष्ट वांशिक आणि भौगोलिक गटांमध्ये होणार्‍या विवाहांमुळे मुलांमध्ये थॅलेसेमियासाठी जबाबदार असलेल्या जनुकांचे प्रमाण जास्त वाढते. भारताची अफाट लोकसंख्या आणि उच्च जन्मदर यांमुळे थॅलेसेमियासह जनुकीय विकारांचा प्रादुर्भाव आणखी वाढतो.

थॅलेसेमियाबाबत सर्वसमावेशक जागरूकता आणि शिक्षणाचा अभाव, अनुवंशिक समुपदेशनाची कमतरता, अपुरे प्रतिबंधात्मक उपाय हे घटक कारणीभूत मानले जातात. थॅलेसेमियासाठी जन्मपूर्व आणि विवाहपूर्व तपासणीची अंमलबजावणी हे मोठे आव्हान आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. रक्तसंक्रमण आणि विशिष्ट थेरपीसह वैद्यकीय सेवांच्या उपलब्धतेबाबत शहरी आणि ग्रामीण भागांत असलेली असमानता यामुळे थॅलेसेमिया आजारावर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतात. शहरी भागातील आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यसेवा सहज मिळत असल्या, तरी ग्रामीण भागात पुरेसे उपचार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

भारतामध्ये थॅलेसेमिया तीव्र आणि मध्यम असलेली अंदाजे 4 लाख ते 6 लाख मुले आहेत. त्यांना रक्तसंक्रमणाची आवश्यकता असते. थॅलेसेमिया मेजर असलेल्या व्यक्तींचे सरासरी आयुर्मान केवळ रक्तसंक्रमणावर अवलंबून असते आणि ते सुमारे 17 वर्षे असते. आयर्न चेलेशन नावाच्या थेरपीने आयुर्मान अंदाजे 30 वर्षांपर्यंत वाढू शकते. भारतात दर वर्षी थॅलेसेमिया मेजरचे 10 ते 20 हजार नवीन रुग्ण आढळून येतात. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अनुवंशिक समुपदेशन, शैक्षणिक उपक्रम, सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम आणि सुधारित आरोग्य सेवा आवश्यक आहे.

– डॉ. विजय रामानन, हिमॅटोलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक.

हेही वाचा

Back to top button