पैजावर पैजा आणि सट्टा बाजारातही मज्जा! | पुढारी

पैजावर पैजा आणि सट्टा बाजारातही मज्जा!

सुनील कदम

लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत राज्यभर पैजावर पैजा लागताना दिसत आहेत. शे-पाचशेपासून काही लाखांच्या घरात पैजा लागताना दिसत आहेत. दुसरीकडे निवडणूक निकालाधारित सट्टा बाजारही तेजीत आहे; पण रोज दोलायमान होताना दिसत आहे.

कमालीची चुरस!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘न भूतो न भविष्यति’ अशी चुरस निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. या निवडणुकांचे निकालच उद्याच्या विधानसभा निवडणूक निकालांची नांदी ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच नेत्यांनी प्रचारासाठी जिवापाड मेहनत घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांचे नेमके भाकीत करणे भल्याभल्या जाणत्या राजकीय नेत्यांनाही अवघड होऊन बसले आहे. कारण एका एका जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे.

चुरशीचे मतदारसंघ!

साहजिकच त्यामुळे राज्यभरात निवडणूक निकालाबाबत पैजांना नुसता ऊत आल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने बारामती, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, माढा, सोलापूर, पुणे, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, नांदेड, नाशिक, शिरूर, दक्षिण मध्य मुंबई अशा जवळपास वीस मतदार संघांमधील लढतींकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे साहजिकच या मतदार संघातील निवडणूक निकालावर मोठ्या प्रमाणात पैजा लागलेल्या दिसत आहेत. पैजा लागलेल्या मतदार संघात बारामती, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि माढा हे पाच मतदारसंघ अग्रस्थानी आहेत.

पैजांना उधाण!

आपलाच इच्छित उमेदवार त्या त्या मतदार संघातून निवडून येईल, असा अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे त्या-त्या उमेदवारावर नागरिक आपापल्या आर्थिक ऐपतीनुसार शे-पाचशेपासून लाखो रुपयांच्या पैजा लावताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील काही बहाद्दरांनी तर जमिनीच्या एकरा-दोन एकरांच्या पैजा लावलेल्याही दिसत आहेत. अर्थात पैजा त्या पैजाच असतात, पैज म्हणजे काही कायदेशीर व्यवहार नाही, सगळा विश्वासावर आधारित तोंडीबोली व्यवहार; पण बोललेल्या पैजा पाळणार्‍यांचीही काही कमी नाही. त्यामुळे तर पैजा लावणार्‍यांचीही काही कमी नाही.

कोट्यवधींचा सट्टा!

दुसरीकडे अंडरग्राऊंड चालणार्‍या सट्टा बाजारातही कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. इथेही प्रामुख्याने बारामती, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, माढा, सोलापूर, पुणे, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, नांदेड, नाशिक, शिरूर, दक्षिण मध्य मुंबई अशा चुरशीच्या मतदार संघांच्या संभाव्य निकालावरच सट्टा लावला जाताना दिसत आहे. सट्टाबाजार तेजीत असला तरी रोज दोलायमान होताना दिसत आहे. वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा किंवा एक-दोन मेळावे झाले की चुरशीच्या मतदार संघातील संभाव्य निकालही खाली-वर होताना दिसत आहेत. त्यामुळे त्या त्या मतदार संघातील सट्टाबाजारही खालीवर होताना दिसत आहे. परिणामी, आज एकाच्या बाजूने पैसे लावणारा उद्या दुसर्‍याच्याच बाजूने पैसे लावताना दिसत आहे. सट्टेबाजारातही संभाव्य निकालाबाबत कुणाला ठाम खात्री नसल्याचे दिसत आहे. सट्टा बाजारातही बारामती, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि माढा हे पाच मतदारसंघच अग्रस्थानी असल्याचे दिसत आहेत. आजकाल सट्टा बाजारातील सगळ्या उलाढाली ऑनलाईन होत असल्यामुळे पोलिसांना मात्र या सट्टा बाजारातील सटाडियांपर्यंत पोहोचणे अडचणीचे होऊन बसले आहे.

पैजा आणि सट्ट्यावरून निकालाचा अंदाज!

राज्यातील जवळपास वीस मतदार संघांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत आणि प्रामुख्याने हेच वीस मतदारसंघ पैजा आणि सट्ट्याच्या निशाण्यावर आहेत. या मतदार संघातील लागलेल्या पैजा आणि लावण्यात आलेला सट्टा नुसता विचारात घेतला, तरी निवडणूक निकालाचा प्राथमिक अंदाज येऊ शकतो. काही मतदार संघांमध्ये वेगवेगळे राजकीय आडाखे मांडून लाखो रुपयांच्या पैजा लागलेल्या आहेत, तर काही मतदार संघातील संभाव्य विजयी उमेदवाराच्या नावे कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागलेला आहे. तिथला जो कल आहे, तोच निवडणूक निकालाचा अंदाज असू शकतो.

Back to top button