राज्यात उच्चांकी गाळप; तरीही 858 कोटी ‘एफआरपी’ थकीत | पुढारी

राज्यात उच्चांकी गाळप; तरीही 858 कोटी ‘एफआरपी’ थकीत

प्रवीण ढोणे

राशिवडे : राज्यातील 207 साखर कारखान्यांनी अपेक्षेपेक्षा उच्चांकी ऊस गाळप करत गाळपाचे अंदाज फोल ठरवले. हंगामाची सांगता झाली तरी, 80 साखर कारखान्यांनी अद्यापही एफआरपीची रक्कम दिलेली नाही त्यामुळे 858 कोटीची एफआरपी अद्याप थकीत आहे. थकीत राहण्याचे प्रमाण 2.58 टक्के इतके आहे.

राज्यामधील 103 सहकारी आणि 104 खासगी अशा 207 साखर कारखान्यांनी गळीत हंगामामध्ये सहभाग घेतला. गाळप झालेल्या उसाची एफआरपी 33 हजार 198 कोटी होती. पैकी 32 हजार 340 कोटीची रक्कम आदा करण्यात आली आहे. उर्वरित 858 कोटी रक्कम अद्यापही थकीत आहे. 127 कारखान्यांनी पूर्ण रक्कम आदा केली. उर्वरित 80 कारखान्यांची एफआरपी थकीत राहिली आहे. 52 कारखान्यांनी 80 ते 90 टक्के, 77 कारखान्यांनी 60 ते 79 टक्के तर 11 कारखान्यांनी शून्य ते 69 टक्के एफआरपी आदा केली आहे. ही रक्कम चौदा दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना रक्कम विलंबाने शेतकर्‍यांच्या पदरात पडत आहे. तसेच अपेक्षित गाळपापेक्षा अधिक गाळप झाल्याने कारखान्यांना आर्थिक उलाढाली करताना चांगलीच दमछाक सोसावी लागली. तरीही 97.42 टक्के एफआरपी आदा करण्यात आली आहे.

प्रामुख्याने इथेनॉल निर्मितीवरील बंधने, साखर निर्यातीबाबतचे कचखाऊ धोरण यामुळे कारखाने आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. कर्मचारी पगारासह एफआरपीची रक्कम आदा करण्यासाठी साखर कारखान्यांना कर्जाचाच आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे अंतिम टप्प्यात एफआरपी काही प्रमाणात म्हणजेच एकूण एफआरपीच्या आर्थिक उलाढालीतील 2.58 टक्के थकली आहे.

Back to top button