फडणवीसांना नमस्कारही कोणी करणार नाही : रवींद्र धंगेकर यांचे टीकास्त्र | पुढारी

फडणवीसांना नमस्कारही कोणी करणार नाही : रवींद्र धंगेकर यांचे टीकास्त्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण केले, अनेक गुन्हेगारांना जवळ केले, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यामुळे राज्यातील जनतेला त्यांचे कटकारस्थान पटलेले नाही. येणार्‍या पुढच्या काळात फडणवीस यांना नमस्कारही कोणी करणार नाही, अशी टीका पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा झाली. त्याआधी धंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, आता सर्वसामान्य लोक हे आमच्यामागे उभे आहेत. कारण सध्याच्या सरकारच्या काळात अनेक चुकीच्या, जाचक, तत्त्वहीन गोष्टी घडल्या आहेत. याचा जनतेला वीट आला आहे. महाराष्ट्र हा छत्रपती श्रीशिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा आहे.

त्यांचे विचार जोपासणारा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी महाराष्ट्राला पुढे घेऊन आले आहेत. जनतेचा विकास केला. त्याच मार्गाने पुढे जाण्याऐवजी फडणवीस यांनी गुन्हेगारांना मदत करण्याची, त्यांना सत्तेत बसवण्याची वाट निवडली. अनेक गुन्हेगारांना त्यांनी आशीर्वाद दिला. असे राजकारण त्यांनी थांबवावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्यथा पुढच्या काळात ते जेव्हा सत्तेत नसतील, तेव्हा त्यांना नमस्कारही कोणी करणार नाही, असेही धंगेकर म्हणाले.

हेही वाचा

Back to top button