पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी ताफ्यातील 931 बस दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीसंदर्भातील कामे जरी व्यवस्थित होणार असली, तरी पुणेकर प्रवाशांचे प्रवास करण्यासाठी आणखी हाल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या 2089 बस गाड्या आहेत. पुण्याची लोकसंख्या पाहाता पुणेकर प्रवाशांसाठी रस्त्यावर 931 बस आवश्यक आहेत. मात्र, सध्या 1600 ते 1700 च बस रस्त्यावर धावत आहेत. त्यातही दिवसाला सुमारे 50 बस ब्रेकडाऊन होत आहेत.
त्यामुळे पुणेकर प्रवाशांना मोठी कसरत करत बसमधून प्रवास करावा लागत आहे. बससाठी थांब्यांवर तासन्तास प्रवाशांना थांबावे लागत आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी 931 बस जाणार असतील, तर पुणेकरांनी कसा प्रवास करायचा, असा सवाल पुणेकर नागरिकांकडून केला जात आहे. पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले, निवडणुकीच्या कामासाठी आम्ही 931 बस देणार आहोत. दि. 12 व 13 तारखेला 818 बस देण्यात येतील, तर दि. 6 व 7 रोजी 113 बस देण्यात येणार आहेत. प्रवाशांना बस कमी पडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
हेही वाचा