दक्षिण आशियात यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त; या भागांत चांगला पाऊस : हवामानतज्ज्ञांची पुण्यात बैठक | पुढारी

दक्षिण आशियात यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त; या भागांत चांगला पाऊस : हवामानतज्ज्ञांची पुण्यात बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदाचा मान्सून केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातील देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त बरसणार असल्याचे सूतोवाच पुण्यात मंगळवारी पार पडलेल्या दक्षिण आशियाई हवामान अंदाज बैठकीत शास्त्रज्ञांनी केले. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साऊथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमची (दक्षिण आशियाच्या विविध देशांतील हवामानतज्ज्ञ) एकदिवसीय बैठक पार पडली. यात दक्षिण आशियातील शास्त्रज्ञांनी आगामी मान्सूनचा अंदाज व्यक्त केला. यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील दीर्घ पल्ल्याच्या मोसमी पावसाचा सविस्तर अंदाज यावेळी देण्यात आला आहे. त्यावरुन पुढील नियोजन करण्यास मदत मिळणार आहे.

या भागांत चांगला पाऊस

या बैठकीत शास्त्रज्ञांनी सांगितले की, उत्तरेकडील काही भाग वगळता दक्षिण आशियातील बहुतेक भागांवर सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत तो सर्वसामान्य असण्याची शक्यता आहे. आशियातील बहुतेक भाग जेथे सामान्य तापमान बहुधा असते, हंगामी कमाल तापमान आहे, काही विलग क्षेत्र वगळता प्रदेशाच्या बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. साऊथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमचे पुण्यात मंगळवारी 28 वे सत्र आयोजित केले. यात बहुतांश हवामानशास्त्रज्ञ ऑनलाइन सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, कोरिया, जपान या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अल निनो तटस्थ होऊन कमकुवत होणार

तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरावर अल निनोची मध्यम स्थिती आहे. महासागराचे तापमान आणि जागतिक हवामान मॉडेलवर तज्ज्ञांचे एकमत झाले. तज्ज्ञांच्या मते प्रचलित अल निनोची स्थिती तटस्थ होऊन ती आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात निनो सदर्न ऑसिलेशन परिस्थिती आणि मान्सूनच्या उत्तरार्धात ला निना परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तथापि, त्याची ताकद आणि त्याच्या प्रारंभाच्या वेळेत अनिश्चितता आहे.

या हवामान संघटना सहभागी

पुण्यात झालेल्या या बैठकीत दक्षिण आशियाई हवामान आउटलूकचे 28 वे सत्र पार पडले. यात भारताच्या राष्ट्रीय हवामान आणि जलविज्ञान सेवांचे प्रतिनिधी, नऊ दक्षिण आशियाई देशांचे प्रतिनिधी, जागतिक हवामान संघटनेसह प्रादेशिक हवामान संस्था, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट आणि सोसायटी आदी संस्था सहभागी झाल्या होत्या.

ही परिषद दोन दिवस असून, भारतासह नऊ देश सहभागी झाले आहेत. यात दक्षिण आशियाई देशात पावसाचा अंदाज कसा राहील, यावर चर्चा झाली. म्यानमार वगळता बहुतांश देशात चांगला पाऊस राहील, असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले.

– डॉ. डी. एस. पै, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग, दिल्ली

हेही वाचा

Back to top button