गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरामध्ये पाण्याचा प्रश्न तीव्र बनताना दिसत आहे. पाण्यामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते, अशी चर्चा काही वर्षांपूर्वी ऐकायला मिळायची. यंदाच्या जागतिक जलदिनाची थीमही 'शांततेसाठी पाणी' अशी होती. शांतता असेल तर आणि तरच जगाला स्थैर्य आणि भरभराट प्राप्त होऊ शकते. जलसाठे प्रदूषित असतील वा पाण्याचे असमान वितरण असेल तर जगात शांतता नांदू शकत नाही, हा त्यातील मतितार्थ आहे.
आज महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यांमध्ये मे महिना आणि जून महिन्यातील मान्सूनचा वर्षाव होईपर्यंतचा काळ कसा काढायचा, याच्या चिंतेत येथील समाजमन आहे. टँकरच्या फेर्या वाढत चालल्या आहेत. लांब अंतरावरून पाणी आणणार्यांची संख्या वाढत आहे. ही स्थिती चिंताजनक आहे. जगातील 3,00,00,00,000 जनता दुसर्या देशातून आलेल्या पाण्यावर अवलंबून आहे. जगातील 153 देश हे शेजारी राष्ट्रांशी नद्या, तलाव वा जलधर वाटून घेत असताना त्यापैकी केवळ 24 देश असे आहेत की, ज्यांनी शेजारी राष्ट्रांशी पाण्याबाबत सहकार्य करार केलेले आहेत. प्रश्न एवढ्यावरच थांबलेला नाही, तर वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलामुळे समस्या अधिक बिकट बनली आहे. आणि या सर्व बदलत्या परिस्थितीत शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठायचे आहे. जगातील पाण्यासंबंधात कोणकोणते प्रश्न डोके वर काढत आहेत, याची यादीच तयार करायची ठरवल्यास हवामान बदलामुळे पाणीपुरवठ्यात होणारी अनियमितता, पूर आणि दुष्काळांमुळे येणार्या आपत्ती, खालावत जाणारी जैव विविधता, संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी अर्थप्रबंधन, पाण्यामुळे महिलांवर येणारे ताणतणाव, पाण्याशी निगडित मानवी हक्क, शहरीकरणाशी निगडित पाणीप्रश्न, अन्न आणि शक्ती सुरक्षितता, वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यात येणार्या अडचणी यांसारख्या प्रश्नांचा उल्लेख करावा लागेल.
जगात आधीच रशिया आणि युक्रेन व इस्रायल आणि हमास ही युद्धे सुरू आहेत. त्यात पाण्यामुळे अधिक भर पडायला नको, असे प्रत्येकाला वाटत असले तरी पाण्यासाठी पराधीन असलेला माणूस कधी बिथरेल व शांतता भंग करेल, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. ही समस्या निर्माण करणारा माणूस या संबंधात काहीच हालचाल का करत नाही, हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. माणसाने या संदर्भात विचार केला नाही, तर कोणतेही सरकार हा प्रश्न सोडवू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हा प्रश्न सोडवणे तर राहूद्याच, तो अधिकाधिक गंभीर कसा बनत जाईल, याकडे माणूस जास्त लक्ष देत आहे. दिवसेंदिवस माणसाचा पाण्याचा हव्यास वाढत आहे. अशामुळे पाणी संकट दूर जाण्याऐवजी अधिकाधिक जवळ येत चालले आहे.
दुसर्या ग्रहावरून कोणीतरी येऊन ही समस्या सोडवेल अशी जर तुमची समजूत असेल तर तुम्ही मुर्खांच्या नंदनवनात राहत आहात. तुम्ही निर्माण केलेला प्रश्न तुम्हालाच सोडवायचा आहे, हे जितक्या लवकर तुमच्या लक्षात येईल तितके बरे. या संदर्भात मी काय करू शकतो? मी पाणी काळजीपूर्वक वापरणार. ते मी वाया घालवणार नाही. ते मी प्रदूषित होऊ देणार नाही. दुसर्याचाही त्या पाण्यावर हक्क आहे, याची मी जाणीव ठेवेन. मी जमिनीतून विनाकारण पाणी उपसणार नाही. मी जर जमिनीत पाणी भरले नसेल तर मला पाणी उपसण्याचा हक्क नाही. मी स्वतः जलसाक्षर होईन आणि व इतरांनाही जलसाक्षर करेन. नद्या व इतर जलसाठे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन. पाण्यासाठी कोणताही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेईन. उद्याचे जीवन मला सुसह्य करायचे असेल तर मी पाणीप्रश्न सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करेन. या पाण्यावर निव्वळ माझाच नाही, तर पुढच्याही पिढ्यांचा हक्क आहे, याची मला जाणीव आहे. वर दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करेन, अशी शपथ घेण्याची गरज आहे.